परंडा/प्रतिनिधी:
नगरपालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे रणधुमाळी लवकरच सुरू होण्याचे शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जवळा जिल्हा परिषद गटातून राहुल मोटे यांचे विश्वास शिलेदार कृषी उत्पन्न बाजार समिती परंडा चे माजी उपसभापती संजय पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. सर्वसामान्य जनतेच्या वतीनेच त्यांची उमेदवारी पक्ष नेतृत्वाकडे मागितली जात आहे. त्यांच्या उमेदवारीसाठी गावातील कार्यकर्त्यांनी माजी आमदार राहुल मोटे यांच्याकडे शिफारस केल्याची ही माहिती समोर येत आहे. हा मतदारसंघ सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी असल्यामुळे मोठी चुरस पाहावयास मिळत आहे.
जवळा जिल्हा परिषद गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. या गटामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे हे विद्यमान सदस्य आहेत. दत्ता अण्णा साळुंखे हे तानाजी सावंत यांचे शिलेदार म्हणून ओळखले जातात. पुन्हा त्यांनाच उमेदवारी मिळणार हेच मानून त्यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवातही केली आहे.
जवळा जिल्हा परिषद गटामध्ये जवळा, सिरसाव, वाकडी, भांडगाव, कांदलगाव, हिंगणगाव, बोडका, दहिटणा, बावची, आरणगाव, टाकळी, येणेगाव, घरंगाव, बुकी या गावांचा समावेश होतो. जवळा गणातून पंचायत समिती सर्कलसाठी सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण जाहीर झाल्यामुळे मोठी चुरस पहावयास मिळत आहे. यामध्ये उमेदवारी कोणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. मोठ्या गावामध्ये विशेषता जवळा, वाकडी व सिरसाव या गावचे मतदान ३००० पेक्षा जास्त आहे, त्या ठिकाणी माजी आमदार राहुल मोटे समर्थकांचे वर्चस्व आहे.
सिरसाव गावचे माजी सरपंच ते परांडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अशी त्यांची कारकीर्द आहे. सुरुवातीच्या काळापासूनच संजय पवार हे माजी आमदार राहुल मोटे यांचे एकनिष्ठ समजले जातात. त्यामुळे राजकारणात सक्रिय असलेल्या पवार यांनाच पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून जवळा गटात राजकीय हालचालीला वेग आला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments