सांगोल्याच्या भाविकाची असीम श्रद्धा! श्री तुळजाभवानी चरणी ७ लाखांचे सुवर्ण मंगळसूत्र अर्पण
तुळजापूर:महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी एका भाविकाने लाखोंचे सुवर्णदान केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील चिकमहुद येथील रहिवासी शहाजी रामचंद्र जाधव यांनी देवीला तब्बल सव्वासात लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण केले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चिकमहुद (ता. सांगोला) येथील भाविक शहाजी रामचंद्र जाधव हे आज सकाळी आपल्या पत्नीसह तुळजापुरात देवीच्या दर्शनासाठी आले होते. आई तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर, जाधव दांपत्याने अत्यंत भक्तिभावाने देवीच्या चरणी ५१.५४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण केले. या सुवर्ण दानाची किंमत अंदाजे ७ लाख २७ हजार रुपये इतकी आहे.
या वेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने या दानशूर भाविकाचा गौरव करण्यात आला. मंदिर संस्थानतर्फे जाधव दांपत्याला आई तुळजाभवानीची प्रतिमा आणि महावस्त्र भेट देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे सहायक धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले, राकेश पवार तसेच मंदिर संस्थानचे इतर कर्मचारी उपस्थित होते. देवीच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या या गुप्तदानाची चर्चा सध्या मंदिर परिसरात आणि भाविकांमध्ये होत आहे.
0 Comments