निमसाखरचे प्रा. राहुल भोसले यांना पीएच.डी (डॉक्टरेट) पदवी


पुणे/प्रतिनिधी:

 प्रा. राहुल भोसले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची (छत्रपती संभाजीनगर)  पीएच.डी पदवी नुकतीच जाहीर झाली आहे. पीएच.डी ही शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च पदवी मानली जाते. त्यांचे शैक्षणिक परिश्रम, सातत्यपूर्ण संशोधनकार्य आणि कठोर मेहनतीला मिळालेले हे मोलाचे यश आहे. सध्या प्रा. राहुल भोसले हे महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित, आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी, सिंधुदुर्ग येथे कॉमर्स विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 

त्यांनी कळंब येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयातून पदवी (बी.कॉम) पर्यंतचे शिक्षण तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत त्यांनी  वाणिज्य विभाग व संशोधन केंद्रातून पदव्युत्तर (एम.कॉम) चे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच ते जून 2012 मध्ये यू.जी.सी नेट परीक्षा देखील उत्तीर्ण आहेत. त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा, धाराशिव येथील प्रोफेसर  डॉ. केशव लेंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली “जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पतपुरवठा धोरणांची अंमलबजावणी आणि अनुत्पादक मालमत्तेच्या व्यवस्थापन पद्धतीचा अभ्यास (महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विशेष संदर्भासह)” या विषयावर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वित्तपुरवठा धोरणे, त्यातील अडचणी, कर्जवाटप प्रक्रिया तसेच एन.पी.ए व्यवस्थापनातील त्रुटी आणि सुधारणा यांचा सखोल अभ्यास करून त्यांनी हा प्रबंध सादर केला. 

दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी आयोजित मौखिक परीक्षेमध्ये  प्रमुख परीक्षक म्हणून डॉ. संदीप गायकवाड (छत्रपती संभाजीनगर) व बहिस्थ परीक्षक म्हणून डॉ. श्याम साळुंखे (जळगाव) हे ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते. संशोधनाच्या गुणवत्तेमुळे त्यांचा शोधप्रबंध मान्य करण्यात आला आणि त्यांना पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली. प्रा. राहुल भोसले यांनी  मिळवलेल्या या यशाबद्दल महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष,  माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री विनोदजी तावडे , संस्थेचे सर्व विश्वस्त, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही.गवळी , उपप्राचार्य व कॉमर्स विभाग प्रमुख डॉ. एम.आय.कुंभार, कार्यालयीन अधीक्षक श्री.संजय रावराणे , महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले. प्रा. राहुल भोसले यांचा शैक्षणिक प्रवास हा धैर्य, चिकाटी आणि  गुणवत्तेचे प्रतीक असून त्यांच्या पुढील संशोधन आणि शैक्षणिक कार्यासाठी सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments