सोलापूरची गंगा | अंध महिलांच्या T-20 विश्वचषकात भारत विश्वविजेता; सोलापूरच्या गंगा कदमची झळाळती कामगिरी


सोलापूर | प्रतिनिधी

अंध महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने नेपाळचा सात गडी राखून पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. या चमकदार विजयानंतर विश्वचषकावर भारताचे नाव कोरले गेले असून, या यशात सोलापूरची गंगा कदम हिने ठळक मोहोर उमटवली आहे.

संपूर्ण स्पर्धेत गंगा कदमने उत्कृष्ट गोलंदाजी, धारदार क्षेत्ररक्षण आणि संकटमोचक फलंदाजीची धमक दाखवली. तिच्या गोलंदाजीने तीन फलंदाज तंबूत परतले, तर पाठलाग करताना सहा फलंदाज धावचीत करण्यामध्ये ती प्रभावी ठरली. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात तिने सामनावीराचा मान पटकावून दमदार सुरुवात केली होती.

उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा नऊ गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना भारताने ऑस्ट्रेलियाला 109/9 धावांत रोखले. हे माफक लक्ष्य भारतीय संघाने केवळ 11.5 षटकांत एकाच गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले.

सलामीला उतरत गंगा कदमने जबाबदारीची खेळी करत 31 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 41 धावा केल्या. गोलंदाजीतदेखील तिचा अचूकतेवर भर दिसला—तिने 2 षटकांत फक्त 5 धावा देत 1 षटक निर्धाव टाकले. या सर्वांगिण कामगिरीमुळे भारताच्या विजयात तिचा मोलाचा वाटा ठरला.

“गंगा कदमने माझे स्वप्न साकार केले” — प्रशिक्षक राजू शेळके

गंगा कदमच्या प्रशिक्षक राजू शेळके यांनी भावनिक प्रतिक्रिया देताना सांगितले,
“भारताच्या विश्वचषक विजयात माझी शिष्या गंगा कदम हिचा अमूल्य वाटा आहे. एक प्रशिक्षक म्हणून माझे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न तिच्या माध्यमातून पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे.”

कष्टकऱ्यांच्या घरची मुलगी जागतिक मंचावर

गंगा कदम ही सोलापूरची प्रतिभावान अंध क्रिकेटपटू असून तिचे वडील दुसऱ्यांच्या शेतात सालगडी म्हणून मजुरी करतात. अशा परिस्थितीतून पुढे येत तिने आपल्या जिद्दीच्या जोरावर भारताचा तिरंगा जागतिक स्तरावर उंचावला आहे. गंगाचे हे यश सोलापूरकरांसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.

Post a Comment

0 Comments