धाराशिव |
मातंग समाजाच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी लहुजी शक्ती सेनेद्वारे आयोजित केलेला 'राज्यव्यापी कार्यकर्ता संवाद मेळावा' उद्या (२५ ऑगस्ट) यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचा शुभारंभ होईल.
लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मेळाव्यात अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरण, क्रांतिवीर लहुजी साळवे व लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या राष्ट्रीय स्मारकासह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. संघटनेचे प्रदेश प्रवक्ते डॉ. मारुती लोंढे यांनी सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी होण्याचे आवाहन समाजातील सर्व घटकांना केले आहे.
"मातंग समाजाच्या विकासासाठी सरकारने अद्याप पुरेसे काही केलेले नाही. उपवर्गीकरण, रोजगार हमी, शैक्षणिक सुविधा यासारख्या मूलभूत मागण्या आजही अपूर्ण आहेत. या मेळाव्याद्वारे आम्ही सरकारसमोर ठोस मागण्या मांडणार आहोत," असेही लोंढे यांनी सांगितले
या निमित्ताने लहुजी शक्ती सेनेने सरकारकडे मांडण्यासाठी १२-मुद्द्यांची मागणीपत्रिका तयार केली आहे, ज्यामध्ये समाजाला मिळणाऱ्या आरक्षणातील विषमता दूर करणे, लहुजी साळवे आयोगाच्या अंमलबजावणीसाठी विशेष तज्ञ समिती नेमणे, डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यासाठी केंद्राकडे शिफारस करणे यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे.
उल्लेखनीय आहे की, महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी क्रांतिवीर लहुजी साळवे आयोगाच्या ८२ शिफारशींपैकी ६८ शिफारशी मान्य केल्या होत्या, तरीही त्यांच्या अंमलबजावणीत ढिलाई केल्याचा आरोप समाजाच्या विविध संघटना करत आहेत. उद्याच्या मेळाव्यात या शिफारशींच्या पूर्ण अंमलबजावणीची मागणी करण्यात येणार आहे.
0 Comments