मन सुन्न करणारी बातमी: सातारा येथे महिलेचा गळा चिरून खून!



सातारा जिल्ह्यातील शिवथर येथे सोमवारी (७ जुलै २०२५) दुपारी एका २५ वर्षीय महिलेचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूजा प्रथमेश जाधव असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेने शिवथर परिसरात एकच खळबळ उडाली असून, खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सातारा तालुका पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा जाधव हिचे घर शिवथर गावापासून शिवथर-मालगाव रस्त्यावर सुमारे एक किलोमीटर अंतरावर आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास घरातील सदस्य कामासाठी बाहेर गेले असताना पूजा घरी एकटीच होती. पूजाचे सासू-सासरे शेतात कामाला गेले होते, तर पती प्रथमेश जाधव सकाळी साडेनऊ वाजता मुलाला शाळेत सोडून सातारा येथील आनंद ट्रेडर्समध्ये कामावर गेला होता. त्यांचा सात वर्षांचा मुलगा यश जाधव शाळेत गेला होता.

दुपारच्या सुमारास पूजाच्या घराचे दरवाजे उघडे पाहून शेजारी राहणाऱ्या एका वृद्ध महिलेने घरात डोकावले असता, पूजा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. हा प्रकार पाहून त्यांनी तात्काळ शेजारील लोकांना आणि शेतात गेलेल्या सासू-सासऱ्यांना बोलावले. सुनेचा झालेला खून पाहून सासू-सासऱ्यांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच प्रथमेश जाधव कामावरून घरी परतले.
या घटनेची माहिती शिवथर आणि परिसरात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली. माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. सायंकाळी उशिरा मृतदेह शवविच्छेदनासाठी 

साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, धारदार शस्त्राने गळ्यावर वार केल्यानेच पूजाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन सुरू होते. पोलिसांनी तांत्रिक तपासासह परिसरातील ग्रामस्थांकडून माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या खुनाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तैनात केली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments