बार्शी बायपासवर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू



बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे येथे भीषण अपघात घडला असून अज्ञात वाहनाच्या धडकेत प्रदीप हरिबा ठोंगे (वय 31) यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदर अपघात 27 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास बार्शी-लातूर बायपास रोडवरील उपळाई ठोंगे चौकात घडला. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

फिर्यादी सुदाम बलभीम ठोंगे (वय 42, व्यवसाय शेती, रा. उपळाई ठोंगे, ता. बार्शी) यांनी दिलेल्या जबाबानुसार, दिनांक 27 फेब्रुवारी रोजी रात्री 9:15 वाजता धनंजय शिंदे यांचा त्यांना फोन आला. त्यात त्यांनी सांगितले की, प्रदीप ठोंगे हे बार्शीहून उपळाई ठोंगेकडे जात असताना उपळाई ठोंगे चौकात अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला (MH-13/DZ-3614) जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच फिर्यादी आणि त्यांचे चुलतभाऊ गोकुळ हरिबा ठोंगे, राहुल नागनाथ ठोंगे तसेच गावातील इतर नागरिक घटनास्थळी पोहोचले. तिथे प्रदीप ठोंगे यांची दुचाकी पूर्णतः मोडलेली अवस्थेत रोडच्या कडेला पडलेली दिसली.

गंभीर जखमी अवस्थेतील प्रदीप ठोंगे यांना तत्काळ 108 रुग्णवाहिकेद्वारे जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी येथे दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आयसीयू विभागात ठेवण्यात आले. उपचारा दरम्यान, 28 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 12:20 वाजता त्यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळावर न थांबता वाहनासह पळ काढला. त्यामुळे हा अपघात वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. फिर्यादी सुदाम ठोंगे यांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात योग्य ती कारवाई करण्याची मागणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात केली आहे.

या घटनेनंतर बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी वाहनचालकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही संशयास्पद वाहनाची माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments