धाराशिव | पर्यावरण वाचवण्यासह मुली वाचवा मुली शिकवा संदेश देत ११ देशांत पायी भ्रमंती

 तब्बल ४.४८ लाख किलोमीटर प्रवास करत उत्तर प्रदेशातील तरुणांचा चमू धाराशिव जिल्ह्यात दाखल

धाराशिव |

उत्तरप्रदेशातील चार तरुणांनी ११ देशांमध्ये पायी यात्रा करीत तब्बल ४.४८ लाख किलोमीटर इतका प्रवास करून त्यांनी धाराशिव शहरात प्रवेश केला.२९ जानेवारी रोजी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांची जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट घेऊन या यात्रेची माहिती त्यांना दिली. 

पर्यावरण वाचवण्याचा वसा घेतलेल्या या तरुणांना साडेपाच लाख किलोमीटरचा पल्ला गाठायचा आहे. बुधवारपासून दोन दिवस पर्यावरण वाचवण्याचा संदेश देऊन हे ध्येयवादी तरुण पुढील प्रवासास निघाले आहेत. 

२००१ पासून उत्तर प्रदेशातील जितेंद्र प्रताप,महेंद्र प्रताप,गोविंदा नंद आणि निश्चल मौर्य हे चार तरुण पायपीट करून जगभरातील नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी निघाले आहेत.त्यांची टीम आता २० सदस्यांपर्यंत पोहोचली आहे.ही टीम सध्या महाराष्ट्राच्या विविध भागांतून पादाक्रांत करीत आहे.साडेपाच लाख किलोमीटर पायी चालून लोकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्याच्या कार्यात जराही खंड पडू द्यायचा नाही,असा त्यांचा मनोदय असल्याचे त्यांनी सांगितले. 

सन १९८० पासून त्यांचे गुरू अवध बिहारी यांनी उत्तर प्रदेशातून सुरू केलेल्या पदयात्रेच्या माध्यमातून या तरुणांनी भारतात ६०० ठिकाणी १४.५० कोटी वृक्ष लागवड केली आहे.पर्यावरणाचे रक्षण करा,झाडे लावा,पृथ्वी वाचवा,नद्यांचे संरक्षण करा,मुली वाचवा- मुली शिकवा, रस्त्याची सुरक्षा व स्वच्छ भारत मिशन असा त्यांच्या जनजागृतीचा मुख्य उद्देश आहे. 

१९८० मध्ये उत्तर प्रदेशात आलेल्या महापुरात त्यांच्या गुरुंना वडाच्या वृक्षाने आधार देऊन वाचवले होते. तेव्हापासून वृक्ष लागवड आणि पर्यावरण रक्षणाच्या प्रचारार्थ ते जगभरात पायी प्रवास करत आहेत.

धाराशिव जिल्ह्यात जनजागृती करीत असताना लागणारे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.या तरुणांनी जिल्ह्याच्या विविध भागांत फिरून पर्यावरणविषयक जनजागृती केली आहे.त्यांच्या आवाहनाला साद देत हे तरुण ही यात्रा पुढे घेऊन जाणार आहेत.या तरुणांनी ११ देशांचा दौरा केला आहे. 

केंद्र व राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनाबरोबरच हे तरुण पर्यावरणाचे रक्षण करा,झाडे लावा,पृथ्वी वाचवा,नद्यांचे संरक्षण करा,मुली वाचवा - मुली शिकवा, रस्त्याची सुरक्षा,पाणी जपा आणि स्वच्छ भारत मिशन आदींची जनजागृती शाळा-महाविद्यालयांमधून करीत आहेत.
    
जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

विश्वभ्रमंतीसाठी निघालेला हा चमू सध्या धाराशिव जिल्ह्यात पोहोचला आहे.बुधवारी त्यांनी  जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.आपल्या मिशन संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी यांना अवगत केले.जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यांनी त्यांचे कौतुक करीत उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments