लोकसभेनंतर लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीकडून सध्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. मात्र या दोन्ही आघाडीने अद्याप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नाही. अशात भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर्स लावण्यात आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात सध्या याचीच चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील कार्यकर्त्यांकडून आपापल्या नेत्यांच्या मुख्यमंत्रीपदासाठीच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. नांदेडमध्ये फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले आहेत. या बॅनरमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भावी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचे बॅनर्स
राज्यात महायुतीकडून ‘लाडकी बहीण योजना’ राबवण्यात येत आहे. या योजनेचा देखील महायुतीमध्ये वेगवेगळा प्रचार केला जातोय. शिंदे गटाकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ असे पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यात आले. तर, अजितदादा गटाकडून फक्त ‘माझी लाडकी बहीण’ असा प्रचार करण्यात येत आहे. या योजनेच्या श्रेयवादावरूनही महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे.
बारामतीत अजितदादांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर
अशात मुख्यमंत्रीपदावरूनही यांच्यात सुरू असलेला वाद आता चव्हाट्यावर आला आहे. बारामतीत अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. बारामती शहरातील अखिल भारतीय तांदुळवाडी वेस या गणपती मंडळाने अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लावले. यापूर्वी देखील अनेक वेळा अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले फ्लेक्स लागले होते.
तर, दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांसमोर मोठं विधान केलं. महायुतीला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळणार आणि पुन्हा महायुती सत्तेत येणार आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं मला वाटतं, असं ते म्हणाले होते. त्यानंतर भाजपकडून नांदेडमध्ये फडणवीस यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या मुख्यमंत्रीपदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र दिसून येतंय.
0 Comments