राज्यात ‘माझी लाडकी बहीण योजना’ योजनेवरून सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. ‘युवक’ प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.
आज नागांना दूध पाजले जाते. पण पवार साहेबांनी ज्या नागांना गेली वीस वर्षे दूध पाजले, त्या नागांनी फणा काढला अन् दूध पाजणाऱ्या पवार साहेबांना ते डसले. बारामतीच्या जनतेने दाखवून दिलं आहे. लाडकी बायको नसते तर लाडकी बहीणचं असते. मग या सरकारला लाडकी बहीण आठवली, अशी टीका मेहबूब शेख यांनी केलीये.
“ज्या नागांना गेली वीस वर्षे दूध पाजलं”
वीस वर्षे दूध पाजणाऱ्या पवार साहेबांना या नागांनी डसले आहे. स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांनी जे पेरलं ते का उगवलं नाही. आता ते लोक आपल्याकडे हेलपाटे मारत आहेत. त्यांना परतीचे डोहाळे लागले आहेत. पण जे लोकसभेआधी आले त्यांचं स्वागत केलं आहेच. पण जे उरलेत ते ‘अली बाबा चाळीस चोर’ आहेत, असं मेहबूब शेख म्हणालेत.
अजित पवारांच्या ‘जनसन्मान यात्रे’ नंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ‘शिवस्वराज्य यात्रा’ सुरू झालीये. या यात्रेची पहिली सभा जुन्नरच्या लेण्याद्रीत झाली. यासभेत बोलताना शरद पवार गटाच्या नेत्यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर निशाणा साधला आहे.
“तुमच्या 1500 रुपयांमध्ये हे सुख मिळणार आहे का?”
तुमच्या 1500 रुपयांमध्ये हे सुख मिळणार आहे का? पण या निर्लज्ज सरकारला याचं काही देणं-घेणं नाही. त्यामुळं यांना महिला अद्याप समजल्या नाहीतच. सरकारला वाटतं महिलांचे मन फक्त पैशात अडकले आहे, अशी टीका रोहिणी खडसेंनी केली.
लाडकी खुर्ची योजना सुरू आहे. या लाडक्या खुर्चीसाठी वाट्टेल तितकी लोटांगणं घालण्याची तयारी या महायुतीने ठेवली आहे. यासाठी दिल्ली दरबारी दौरे सुरु आहेत. त्यामुळं आता आपल्याला स्वाभिमान जागवणारे सरकार आपल्याला राज्यात आणायचं आहे. त्यासाठी ही ‘शिवस्वराज्य यात्रा’ आपण काढतो, असं अमोल कोल्हेंनी म्हटलंय.
0 Comments