‘या’ धक्कादायक कारणामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान देश सोडून पळाल्या; दिला राजीनामा


 बांगलादेशमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी दिला राजीनामा :
मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशात आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे रूपांतर मोठ्या प्रमाणात झाले आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना ढाका पॅलेस सोडून सुरक्षित स्थळी गेल्या आहेत. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत लाखो लोक कर्फ्यू मोडून रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात आतापर्यंत किमान 300 लोकांचा मृत्यू झाला आहे.

शेख हसीना यांना घेऊन लष्करी हेलिकॉप्टर आज दुपारी अडीच वाजता बंगभवन येथून निघाले आहे. त्यावेळी त्यांची धाकटी बहीण शेख रेहानाही त्यांच्यासोबत होती. ती हेलिकॉप्टरने भारताकडे रवाना झाल्याचे संबंधित सूत्रांनी सांगितले आहे. त्याचबरोबर शेजारील देशात इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प आहे. गेल्या महिन्यात सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाला विरोध करणाऱ्या विद्यार्थी गटांच्या हिंसाचारामुळे शेजारील देशाचे मोठे नुकसान होत आहे.

मात्र या हिंसक वळणामागे नेमके काय कारण आहे असा प्रश्न सर्वाना पडला आहे. तर शासकीय नोकऱ्यांमध्ये मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या बांगलादेशमध्ये हे आंदोलन सुरु आहे. 1971 साली बांगलादेशची निर्मिती झाली आहे. मात्र या लढ्यात ज्या लोकांनी आपले योगदान दिलेले आहे, त्यांच्या वंशजांना मिळत असलेले आरक्षण कायम राहावे, असे आंदोलकर्त्यांचे ठाम मत आहे. तसेच हे आरक्षण आता बंद करावे, असे दुसऱ्या एका गटाचे म्हणणे आहे. मात्र बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रमात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना बांगलादेशमध्ये 30 टक्के आरक्षण मिळत आहे. या देशात धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांना 5 टक्के आरक्षण दिले जाते. एक टक्का आरक्षण दिव्यांगांना देखील दिले जात आहे.

आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बांगलादेशच्या गृह मंत्रालयाने रविवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून देशात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू केला होता. तसेच सरकारी यंत्रणांनी फेसबुक, मेसेंजर, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, हिंसक निदर्शने दरम्यान लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सोमवार, मंगळवार आणि बुधवारी तीन दिवसांची सर्वसाधारण सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments