राज्यात विधानसभेच्या तोंडावर अनेक मोठ्या उलाढाली होत आहेत. अशातच आता येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने राज्यात मोठ्या नियुक्त्या केल्या आहेत. यावेळी शिवसेनेनं नव्या नेत्यांना नाराज न करण्याचं धोरण आमलात आणलं आहे. अशातच आता पुण्याचे दबंग नेते वसंत मोरे यांची देखील शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महाराष्ट्र राज्य संघटकपदी निवड करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
उद्धव ठाकरेंनी अनेक बड्या नेत्यांवर सोपवली जबाबदारी :
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीचं चित्र डोळ्यासमोर ठेऊन राज्यात अनेक बड्या नेत्यांवर जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. अशातच ठाकरे गटाने वरूण सरदेसाई व डबल महाराष्ट्र केसरी असणाऱ्या चंद्रहार पाटील यांच्या खांद्यावर देखील मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आता वसंत मोरे, वरूण सरदेसाई व चंद्रहार पाटील यांना विधानसभेला आमदारकीचं तिकीट मिळणार की नाही? असा थेट सवाल विचारला जात आहे.
शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सचिवपदी संजय लाखे-पाटील यांची नियुक्ती केली आहे. तर ललिता पाटील, वसंत मोरे व मुकेश साळुंके यांची शिवसेना संघटकपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. याशिवाय वसंत मोरे यांना हडपसरमधून तिकीट मिळणार का? अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आज माझी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपा आशीर्वादाने ‘शिवसेना’ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र राज्य संघटकपदी निवड करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेसाहेब यांच्या आदेशानुसार व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेसाहेब, याशिवाय शिवसेना खासदार संजय राऊतसाहेब आणि संपर्क प्रमुख आमदार सचिन आहिरसाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार माझी महाराष्ट्र राज्य संघटकपदी नेमणूक करण्यात आली अशी पोस्ट वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर केली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आधी पुणे मनसेमध्ये वाद झाला होता. त्यानंतर वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकला आहे. राज ठाकरे यांच्याशी बैठक झाल्यानंतर देखील वसंत मोरे यांनी मनसेमध्ये न थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. कारण लोकसभेच्या तिकीटासाठी वसंत मोरे हे इच्छूक होते. मात्र ऐनवेळी वंचितकडून वसंत मोरे यांना तिकीट मिळालं पण निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर लोकसभेनंतर वसंत मोरे यांनी ठाकरे गटाचं शिवबंधन हाती बांधलं आणि आता त्यांना आमदारकीचं तिकीट मिळणार का? असा थेट प्रश्न विचारला जात आहे.
0 Comments