वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांची केंद्राकडून चौकशी


 भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने एकसदस्यीय समिती नियुक्त केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयातील एका अतिरिक्त सचिवांमार्फत ही चौकशी केली जाणार आहे. राज्याकडूनही अहवाल पाठविण्याची तयारी दुसरीकडे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केलेला अहवाल केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे. 

 पुणे पोलिसांनीही खासगी गाडीवर लाल दिवा लावल्याप्रकरणी खेडकर यांची चौकशी सुरू केली आहे.
 पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी खेडकर यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तणुकीबाबतचा तपशीलवार अहवाल राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला पाठविला आहे.

 हा अहवाल राज्य शासनाकडून केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालय आणि मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीला पाठविण्यात येणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातून (यूपीएससी) नॉन क्रिमिलेयर आणि बहुविकलांगता (मल्टिपल डिसॅबिलिटी) या दोन प्रकारांतून खेडकर यांची नियुक्ती झाली आहे.

 ‘यूपीएससी’ने सांगूनही त्या सहा वेळा वैद्याकीय तपासणीसाठी गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या निवडीला केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात (कॅट) आव्हान देण्यात आले होते. न्यायाधिकरणाने खेडकरांविरोधात निर्णय दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी बहुविकलांगतेबाबत स्वत:हून तपासणी केलेले एमआरआय प्रमाणपत्र स्वीकारण्यात आल्याचेही समोर येत आहे. या बाबी तसेच त्यांची कार्यालयातील गैरवर्तणूक यांची झाडाझडती होणार आहे.

‘लाल दिव्या’च्या वापराचा तपास सुरू

 पूजा खेडकर यांनी मोटारीवर लाल दिव्याचा वापर केल्याने आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी थकीत २१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्याची कारवाई पुणे पोलिसांनी सुरू केली. 

मात्र पोलिसांच्या पथकाला खेडकर कुटुंबीयांकडून कोणतेही सहकार्य करण्यात आले नाही. त्यांच्या आईने बंगल्याच्या फाटकाला आतून कुलूप लावले व दमदाटी केली. त्यामुळे कारवाई न करताच पोलिसांना माघारी परतावे लागले.

Post a Comment

0 Comments