भाजपाच्या नेत्यांनी मदत केली; विजयानंतर निलेश लंकेंचा गौप्यस्फोट



अहमदनगर |

 नगर लोकसभा मतदारसंघात यंदा महायुतीतील भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्यात पार पडलेल्या अटीतटीच्या लढतीत निलेश लंके यांनी विजय मिळवला आहे. मात्र या दोघांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी होताना दिसल्या. इंग्रजी बोलण्यावरून सुजय विखे यांनी निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर निलेश लंके यांनीही सुजय विखे पाटलांना प्रत्युत्तर दिले होते. तसेच निवडणुका पार पडल्यानंतर निलेश लंके यांनी ईव्हीएम ठेवलेले स्ट्राँगरूम सुरक्षित नसल्याचा आरोपही केला होता. अशातच आता निलेश लंके यांनी विजयानंतर मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

नगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांनी सुजय विखेंचा 29317 मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, पक्षाचे नेते शरद पवार यांच्यासोबत माझं फोनवरून बोलणं झालं आहे. मी त्यांना भेटण्यासाठी कधी येऊ विचारले असता ते दिल्लीला जाणार असल्याचे त्यांनी सांगितल. तसेच त्यांनी मला दिल्ली शिकवतो असं म्हटलं आहे. त्यामुळे आता मी दिल्लीत जाऊन इंग्रजीत भाषण देखील करणार आहे, असा टोला त्यांनी सुजय विखे यांना लगावला. याचवेळी त्यांनी गौप्यस्फोट करताना म्हटले की, हा विजय माझा नसून जनतेचा विजय आहे. भाजपाच्या स्टेजवर उभे राहूनही मला मदत करणाऱ्या त्या सर्व अदृश्य शक्तीचाही हा विजय आहे. त्यामुळे आता मला कुणाबद्दलही काहीही बोलायचे नाही असं निलेश लंके यांनी म्हटले.

Post a Comment

0 Comments