अजित पवार गटाची धडधड वाढली


अजित पवार गटाने महाराष्ट्रात भाजप, शिवसेना शिंदे गटासोबत महायुती केली आहे. या महायुतीमध्ये त्यांना राज्यातील ४८ पैकी चार जागा सोडण्यात आल्या. त्यामध्ये बारामती, शिरुर, रायगड आणि उस्मानाबाद हे मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देण्यात आले. तर परभणी येथून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे महायुतीचे उमेदवार होते. 

ही जागाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात होती, मात्र बारामतीमध्ये धनगर मतांचे समीकरण जुळवण्यासाठी अजित पवारांनी जानकरांना जागा सोडली. तर बारामतीमध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या त्यांच्या नणंद सुप्रिय सुळेंविरोधात लढत दिली. शिरुरमध्ये शरद पवार गटाचे अमोल कोल्हे विरोधात अजित पवारांनी शिवसेनेतून आयात केलेले आढळराव पाटील यांना मैदानात उतरवले होते. तर उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघात भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली. रायगडमध्ये त्यांचे एकमेव विद्यमान खासदार सुनील तटकरे रिंगणात होते. 

या चार जागांपैकी फक्त एक जागा अजित दादा जिंकत असल्याचे एक्झिट पोलमधून सांगितले जात आहे. त्यामुळे अजित पवार गटात खळबळ उडाली आहे. जनतेला राज्यात झालेली पक्षांची फोडाफोडी पसंत नसल्याचे एक्झिट पोलमधून दिसून आले आहे. प्रत्यक्षात निकाल चार जून रोजी जाहीर होईल. तेव्हा जनतेला कौल काय आहे ते समोर येणार आहे. मात्र तोपर्यंत अजित पवार गटाची धडधड वाढली आहे.

Post a Comment

0 Comments