“थोडे दिवस धीर ठेवू, सर्वांना एकमेकांची गरज”; प्रफुल्ल पटेल यांचं मोठं वक्तव्य


 राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना मोठं वक्तव्य केलं आहे. नरेंद्र मोदी हे आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. यासोबतच मोदींच्या नव्या कॅबिनेटचे अनेक मंत्रीही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.मात्र, यामध्ये अजित पवार गटाला संधी देण्यात आलेली नाही.

याबाबत सकाळपासूनच वेगवेगळ्या चर्चा रंगत होत्या. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समोर येऊन याबाबत खुलासा केला. केंद्राकडून अजित पवार गटाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशी एक जागा ऑफर करण्यात आली होती. पण, त्यांनी ती नाकारली. असं फडणवीस यांनी सांगितलं.

अजित पवार गटानेच मंत्रीपद नाकारलं?
अजित पवार गटाला कॅबिमेन मंत्रिपद हवं होतं. पण ते महायुतीच्या निकषात न बसल्यामुळे त्यांना सध्या संधी देण्यात आलेली नाही, असं फडणवीस म्हणाले. यानंतर आता अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही महत्वाची प्रतिक्रिया दिली.

“आमच्या गटाला डावलण्यात आलं किंवा कमी लेखलं गेलं, असं काहीही नाहीये.खासदारांची संख्या घटली किंवा वाढली असा कुठलाही विषय नाही. शिवसेना आणि आमच्या संख्याबळात खूप अंतर आहे. दोन्ही पक्षाला एकच ऑफर केली. याचा अर्थ हे पण समजू नका की, त्यांच्या मनात काही भेदभाव आहे. त्यांनी थोडे दिवस थांबायला सांगितलं आहे.”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?
“आम्ही त्यांच्या शब्दावर आहोत. त्यामुळे थोडे दिवस धीर ठेवू. आज एकमेकांची सर्वांना गरज आहे. राज्यात आता लवकरच विधानसभा निवडणूक आहे. त्या निवडणुकीत आम्हा सर्वांना सामोरं जायचं आहे. नक्कीच आम्हाला खात्री आहे की, काही ना काही योग्य निर्णय त्यांच्याकडून घेण्यात येईल”, असा विश्वास यावेळी पटेल यांनी व्यक्त केला.

पुढे ते म्हणाले की, “यापूर्वी मी भारत सरकारच्या कॅबिनेट मंत्रीपदावर राहिलेलो आहे.त्यामुळे स्वतंत्र प्रभार हे मला घेणं योग्य वाटत नव्हतं. त्यांना अनेक राजकीय पक्षांना सोबत घेऊन काम करायचं असतं. शिवसेनाचे 7 खासदार निवडून आलेत. त्यांना ज्या पद्धतीने सूचना मिळाल्या त्याच हिशोबाने आम्हालाही सूचना देण्यात आल्या आहेत.”,असं प्रफुल्ल पटेल  यांनी सांगितलं.

Post a Comment

0 Comments