यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीमध्ये अटीतटीची लढत होत आहे. आतापर्यंत तीन टप्प्यांत २४ मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीनेमहायुतीला कडवी टक्कर दिल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यातील संभाव्य निकालाबाबत मोठं भाकित केलं आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ३० ते ३५ जागा जिंकेल, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, मला असं दिसतंय की, मागच्या निवडणुकीत पाच वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाने एक जागा जिंकली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळाल्या होत्या. एक एमआयएमला मिळाली. त्यावेळी एकंदरीत सहा जागा विरोधी पक्षांना मिळाल्या होत्या. आता असं दिसतंय की, आम्हा लोकांची महाविकास आघाडीची संख्या ही ३० ते ३५ याच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. त्यात काँग्रेसला १०-१२ जागा मिळतील. आम्हाला ८ ते ९ जागा मिळतील, असं भाकित शरद पवार यांनी केलं.
ते पुढे म्हणाले की, लोकांना रोजगार हवा आहे. लोकांच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विचारांना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील त्यांच्या संघटनेला समर्थन आहे, असा ट्रेंड दिसतोय, तर सध्याच्या परिस्थितीत नरेंद्र मोदी यांना कुणाची ना कुणाची मदत हवी आहे. त्यांचा आत्मविश्वास डळमळलेला आहे, असं निरीक्षण शरद पवार यांनी नोंदवलं.
0 Comments