रणजितसिंह मोहिते पाटलाच्या मुळावरच घातला घाव, खासदार नाईक निंबाळकर बरसले


माढा |

माढा लोकसभा मतदारसंघाची  निवडणूक यंदा रंगतदार झाली आहे. धैर्यशील मोहिते-पाटील विरुद्ध रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातील लढाईमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच खासदार निंबाळकर हे रणजितसिंह मोहिते पाटलावर बरसले आहेत.

खासदार निंबाळकर म्हणाले, "रणजितसिंह मोहिते-पाटील हे कधीही कोषातून बाहेर पडले नाहीत. पुणे, मुंबईतील कॅफेत बसणं ही त्यांची संस्कृती आहे. माळशिरसमधील एखाद्या गावात सोडलं आणि एकट्याला घरी या म्हटलं, तरी रणजितसिंह येऊ शकत नाहीत. माळशिरस तालुक्याशी त्यांना घेणं देणं नाही. तालुक्याबद्दल लगाव नाही. खासदार, विधानपरिषदेचे सदस्य झाले, तरी रेल्वे आणि नीरा-देवघर पाण्याचा प्रश्न सोडवला नाही. मी ते काम केलं. यातील एक काम जरी केल असतं, तर विजयसिंह मोहिते-पाटील कुटुंबावर ही वेळ आली नसती, सतत पक्ष बदलावे लागले नसते."

"मोहिते-पाटील कुटुंबातील मुलांनी संस्था बुडवल्या. याबद्दल जनतेत नैराश्य आहे. पैसे खासगी आयुष्यासाठी वापरले. लोकांची लग्न आणि मुलांचं शिक्षण थांबली आहेत. जिल्हा बँकेचे चेअरमन असताना हजारो कोटींचा घोटाळा झाला. त्या बँकेची चौकशी लागली असून तिथे प्राशासक नेमलं आहे. यांनी मातीत उतरून कधी काम केलं नाही," असा हल्लाबोल खासदार निंबाळकरांनी केला आहे.

"मिळालेलं गबाळ घ्यायचं आणि मुंबईला जायचं, अशी संस्कृती मोहिते-पाटील कुटुंबात रंगली आहे. माळशिरससह सोलापूर जिल्ह्यात यांच्याबद्दल आक्रोश आहे. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याशिवाय जिल्ह्याचं पान हालत नव्हतं. आता मोहिते-पाटील कुटुंबाच्या विरोधात सगळे आमदार आहेत," असंही खासदार निंबाळकर यांनी सांगितलं.

Post a Comment

0 Comments