महाराष्ट्र राज्याची पहिली विधानसभा निवडणूक कशी झालेली ?



1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. मुंबई त्यावेळी द्विभाषिक होतं. या द्विभाषिक राज्यातून आपापली भाषा बोलणारी स्वतंत्र राज्यं असावीत असा आग्रह गुजराती आणि मराठी लोकांनी धरला होता. मराठी भाषिकांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आणि गुजराती भाषिकांनी महागुजरात चळवळीतून ही मागणी लावून धरली आणि अखेर 1 मे 1960 रोजी या राज्यांची विभागणी झाली आणि *स्वतंत्र महाराष्ट्र उदयास* आला.

महाराष्ट्र राज्याची विधानसभेची पहिली निवडणूक ही दोन वर्षानंतर 1962 झाली. 1962 च्या राजकीय परिस्थितीला समजून घेण्यासाठी त्याआधीच्या दोन दशकांची मराठी भाषिक प्रदेशाचा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे

1946 ते 1952 या कालावधीत मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब खेर होते. त्यानंतर मोरारजी देसाई यांनी चार वर्षांसाठी हे पद सांभाळले. त्यानंतर 1956 ते 1960 या चार वर्षांमध्ये यशवंतराव चव्हाण मुंबईचे मुख्यमंत्री होते आणि पुढे 1960 साली महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर स्वतंत्र महाराष्ट्राचे तेच पहिले मुख्यमंत्री झाले.

त्यानंतर दोन वर्षांतच स्वतंत्र महाराष्ट्राच्या पहिल्या विधानसभेची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले 1962 साली महाराष्ट्र विधानसभेच्या 264 मतदारसंघांसाठी निवडणुका झाल्या. स्वातंत्र्यचळवळीपासून काँग्रेसचा असलेला प्रभाव नव्या राज्याच्या निवडणुकांमध्येही दिसून येऊ लागला. या निवडणुकीत काँग्रेसने सर्व 264 जागा लढवल्या आणि त्यातल्या 215 जागा जिंकून विधानसभेत बहुमत मिळवलं.

काँग्रेसनंतर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाकडे केवळ 15 जागा होत्या. यांच्यामध्ये चक्क 200 सदस्यांचं अंतर होतं. त्यानंतर प्रजा समाजवादी पक्षाला 9, कम्युनिस्ट पक्षाला 6, रिपब्लिकन पार्टीला 3 आणि समाजवादी पक्षाला 1 जागा मिळाली. या विधानसभेत 15 अपक्षही होते.

या विधानसभेची स्थापना झाल्यावर सभापतीपदी बाळासाहेब भारदे यांची निवड झाली. 1962 ते 1972 असा प्रदीर्घ काळ ते विधानसभेचे सभापती राहिले.

1962 साली संरक्षणमंत्रिपदी निवड झाल्यामुळे यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्र सोडून केंद्रात जावं लागलं. त्यानंतर मारोतराव कन्नमवार यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावली मतदारसंघातून ते निवडून आले होते.

Post a Comment

0 Comments