अजित पवारांचं बारामतीमुळे पुन्हा टेन्शन वाढणार?बारामती लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीचा निकाल हा येत्या 4 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीत पवार विरूद्ध पवार अशी लढत पाहायला मिळाली होती. बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या आधी दोन्ही गटातून प्रचारांचा सपाटा लावण्यात आला होता. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच विधानसभेची जोरदार तयारी सुरू झाल्याचं समजतंय. 

अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे. तर त्यांच्याविरोधात शरदचंद्र पवार गटातून पवार कुटुंबातील व्यक्तीला विधानसभा निवडणुकीसाठी संधी देतील. यामुळे विधानसभेमध्ये बारामतीत पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार अशी लढत होणार असल्याच्या चर्चा आहेत.

युगेंद्र पवार अजित पवार यांच्याविरोधात लढणार?
शरदचंद्र पवार गटातून बारामती विधानसभा निवडणुकीला  युगेंद्र पवार यांना संधी देण्यात येणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून युगेंद्र पवार हेच सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करताना दिसत आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून युगेंद्र पवार हे बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यालयात येताना दिसत आहेत. आठवड्याचे चार दिवस ते बारामतीत वास्तव्यास थांबताना दिसत आहेत. त्यांच्याकडे अनेकजण प्रश्न घेऊन येत आहेत. सध्या विधानसभा निवडणूक जवळ आली असून याच पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार हे बारामतीत ठाण मांडून आहेत.

सुप्रिया सुळे यांच्या प्रचारावेळी युगेंद्र पवार बारामती तालुक्यातील वाड्यास्तीपर्यंत भेटी देत आहेत. यामुळे आता बारामती विधानसभा मतदारसंघाचा आश्वासक युवा चेहरा म्हणून युगेंद्र पवार यांच्याकडे पाहिलं जात आहे.

Post a Comment

0 Comments