“राजकारणी आहात की गावगुंड, अजित पवारांना निवडणूक जड जाणार”


 समाजसेविका अंजली दमानिया  यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भाषेवरुन त्यांना सुनावलं आहे. अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील मतदारसंघात जाहीर सभा घेत काही नेत्यांना चांगलाच दम भरला होता. यावरून अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर टीका केलीये.

अंजली दमानिया यांनी ट्विट करुन अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राजकारणी आहात की गावगुंड?, असा सवाल अंजली दमानिया यांनी अजित पवारांना केला आहे.

काम चालू हवं असेल तर तुम्ही सुनेत्रा पवारला मदत करा. आधी तिथपर्यंत ठीक होता. आता रोज उठून-उठून धमक्या मिळत आहेत, ते निलेश लंके असो अशोक पवार असो, अमोल कोल्हे असो, किंवा बजरंग सोनवणे असो प्रत्येकाला तुला बघून घेतो, तुला धडा शिकवतो ही जी भाषा आहे ती काय आहे?, असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारला आहे.

एखादा माणूस घाबरला किंवा त्याची लोकप्रियता कमी झाली हे त्याला जेव्हा जाणवतो तेव्हा तो गांगरल्यासारखा वागायला लागतो. आत्ताच्या घटकेला जे आपण बघतो, नरेंद्र मोदी असो किंवा अजित पवार असो, ते दोघे अशा पद्धतीने बोलत आहेत. अजित पवारांकडे जर आपण बघितलं तर लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर रोज वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या ते देत आहेत, असंही दमानिया यांनी म्हटलं आहे.

येणारी नवीन निवडणूक जड जाणार- अंजली दमानिया
आता अजित पवारांना जाणवत आहे की, त्यांची जी लोकप्रियता होती, ती आता मावळली आहे. आता, त्यांनाच नाही, तर त्यांच्या उमेदवारांनासुद्धा महाराष्ट्रात येणारी नवीन निवडणूक अतिशय जड जाणार असल्याचं दमानिया यांनी म्हटलंय.

दरम्यान, अजित पवारांच्या या दमबाजीवरुन आता त्यांच्यावर टीका होत आहे. आमदार रोहित पवार आणि सुनिल केदार यांनी अजित पवारांच्या सभेतील भाषणावरुन त्यांच्यावर पलटवार केला होता.

Post a Comment

0 Comments