करमाळा | मोटर काढताना उजनीत बुडून १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू



करमाळा तालुक्यातील रामवाडी येथील उजनी नदीच्या पात्रात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. ऋषिकेश बाळासाहेब वारगड (वय १७) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना आज (दि.२९) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रामवाडी -निमतवाडी येथे घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, ऋषिकेश हा भाऊ व चुलता यांच्यासमवेत उजनी नदीतील मोटर पाइप व केबल काढण्यासाठी सकाळी नऊच्या सुमारास पाण्यात उतरला होता. तो पोहत मोटारी जवळ जात असताना आलेल्या मोठ्या लाटेत त्याच्या नाका तोंडत पाणी जाऊन तो बुडाला. ग्रामस्थांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले असता तो जागीच मृत झाला होता. सध्या उजनीची पाण्याची पातळी खालावली असल्याने शेतकऱ्यांनी उजनीच्या पात्रात दूरवर मोटारी बसावल्या आहेत. 

मात्र, गेल्या तीन चार दिवसांपासून पुणे जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत असल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. काही ठिकाणी जोराच्या लाटा येत आहेत. त्यामुळे मोटारी वर घेण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. अशीच मोटर वर घेण्यासाठी ऋषीकेश पाण्यात उतरला होता. मात्र जोरात आलेल्या लाटेत तो बुडल्याने त्याचा मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments