अभिजीत पाटील प्रकरण ! देवेंद्र फडणवीसांवर कारवाई करा काँग्रेसची मागणी



सोलापूर |

 अभिजित पाटील अध्यक्ष असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला अर्थसहायाचे आश्वासन देण्याबरोबरच राज्य शिखर बँकेकडून थकीत कर्जापोटी सुरू असलेली कारवाई थांबविण्याचे प्रलोभन दाखवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. याप्रकरणी फडणवीस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आपण निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अभिजित पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात सक्रिय होते. त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा प्रचारही सुरू केला होता. दरम्यान राज्य सरकारने शिखर बँकेच्या माध्यमातून थकीत कर्जापोटी पाटील यांचा कारखाना सील केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री फडवणीस सोलापूर दौर्‍यावर आले असता त्यांनी अभिजित पाटलांशी संपर्क साधून त्यांच्या कारखान्याला थकीत कर्जापोटी मदत करण्याचे प्रलोभन दाखवत सुरू असलेली कारवाई थांबविण्याचे अमिष दाखविले. त्यानंतर अभिजित पाटील यांनी सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. 

तसेच साखर कारखाना सभासदांच्या बैठकीत महायुतीला मतदान करण्याचा ठराव देखील केला आहे. निवडणूक काळात फडणवीस यांनी दबावतंत्राचा वापर करून एक प्रकारे अमिष व प्रलोभन दाखविले आहे. हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. सत्तेमध्ये असलेल्यांना निवडणूक काळामध्ये अशा प्रकारचे कोणतेही अभिवचन अथवा आश्वासन देता येत नाही. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचे दिसून येते. त्यामुळे फडणवीस यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे पटोले यांनी सांगितले.

 
ही निवडणूक मोदींविरुध्द राहुल गांधी नसून ती मोदींविरुध्द जनता अशीच आहे. आता जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे पराभव समोर दिसत असल्याने भाजपचे नेते सैरभैर झाले आहेत, अशी टीकाही पटोले यांनी केली. या पत्रकार परिषदेस माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार वझाहत मिर्झा, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड.नंदकुमार पवार, सेवादलाचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, सुशील बंदपट्टे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments