विराट कोहलीची ऐतिहासिक कामगिरी, या स्टेडियमवर केले महारेकॉर्ड


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली याने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 68 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 29 बॉलमध्ये 162.07 च्या स्ट्राईक रेटने 47 धावांची झंझावाती खेळी केली.

विराट कोहलीने या खेळीत 4 षटकार आणि 3 चौकार ठोकले. विराटचं अर्धशतक अवघ्या 3 धावांनी हुकलं. मात्र विराटने त्याला रनमशीन का म्हणतात हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. विराट कोहलीने एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये इतिहास रचला आहे. तसेच विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणार पहिलाच फलंदाज ठरला आहे.

‘विराट’ महारेकॉर्ड

विराट कोहलीने 13 धावा पूर्ण करताच महारेकॉर्ड केला. विराट आयपीएलच्या इतिहासात एकाच मैदानात 3 हजार धावा पूर्ण करणारा एकमेव फलंदाज ठरला आहे. विराटने आरसीबीच्या डावातील तिसऱ्या ओव्हरमध्ये तुषार देशपांडे याच्या बॉलिंगवर 98 मीटर लांब खणखणीत सिक्स ठोकला. विराटने मारलेला फटका हा छताला लागला. विराटने यासह आपल्या 3 हजार धावा पूर्ण केल्या. विराटच्या नावावर या सिक्ससह चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 3 हजार 5 धावा पूर्ण झाल्या. विराटनंतर एकाच स्टेडियममध्ये सर्वाधिक धावांच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी रोहित शर्मा आहे. रोहितने वानखेडे स्टेडियम या आपल्या होम ग्राउंडमध्ये 2 हजार 295 धावा केल्या आहेत. तर एबी डी व्हीलियर्स याने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 1 हजार 960 धावा केल्या आहेत.

दरम्यान विराट आणि कॅप्टन फाफ डु प्लेसीस या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी करत आरसीबीला शानदार सुरुवात करुन दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 9.4 ओव्हरमध्ये 78 धावांची भागीदारी केली. त्यानंतर विराट आऊट झाला. आता फाफ डु प्लेसीस आणि इतर फलंदाजांच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Post a Comment

0 Comments