ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील संजीवनी बारंगुळे त्यांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता...


बार्शी |

सर्जापुर येथील एका आंदोलनादरम्यान जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिल्याच्या आरोपातून संशयित आरोपी संजीवनी बारंगुळे यांना साक्षीदार हे त्यांच्या साक्षवर ठाम असताना देखील साक्ष मधील विसंगती आणि सबळ पुराव्या अभावी बार्शी येथील मा.अति.सह #जिल्हा_व_सत्र_न्यायाधीश श्री. #रविंद्र_कुलकर्णी यांनी सदर गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केले.

वैराग पोलिसात दि.२७ सप्टेंबर २०२० रोजी दिलेल्या फिर्यादीवरून संजीवनी बारंगुळे यांचे विरूद्ध वैराग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता.

फिर्यादी जबाबानुसार फिर्यादी प्रशांत भालशंकर हे बाळासाहेब कोरके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता त्यांचे सर्जापूर येथील घराकडे जात असताना, बाळासाहेब कोरके यांच्या संस्थेतील शिक्षकांना वेतन मिळत नसल्याने संजीवनी बारंगुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिक्षक व त्यांचे कुटुंबातील सदस्य यांनी संस्थाचालक बाळासाहेब कोरके यांचे घरासमोर त्यांच्या विविध मागण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन सुरू केले होते. त्यावेळी संजीवनी बारंगुळे यांनी फिर्यादिस अपमानास्पद बोलून जातीवाचक शिवीगाळ केली व धमकी दिली अशी फिर्याद दिली होती. यात उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी यांनी तपास करून संशयित आरोपी संजीवनी बारंगुळे यांचे विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१)(r)(s), ३(२)(va), नागरी हक्क संरक्षण अधिनियम कलम ७(१)(d) व भा.द.वि कलम ५०४ नुसार दोषारोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले होते. यात सरकारी पक्षाकडून जे साक्षीदार तपासले, ते त्यांच्या म्हणण्यावर ठाम राहिले. साक्षीदारांच्या साक्ष देण्यातील विसंगतपणा, तसेच शिक्षा देण्याइतपत कोणताही पुरावा सादर करण्यास किंवा सिद्ध करण्यास सरकारी पक्ष असमर्थ ठरले.

सदर गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध सबळ पुरावा नसल्याने मा.अति.सह जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. रविंद्र कुलकर्णी यांनी आरोपीची सदरच्या गुन्ह्यातुन निर्दोष मुक्तता केली. यात आरोपीच्या वतीने ॲड. प्रशांत एडके, ॲड. समाधान सुरवसे, ॲड. सुहास कांबळे व ॲड. आकाश तावडे यांनी काम पाहिले.


Post a Comment

0 Comments