अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का, विश्वासू आमदार लागले शरद पवार गटाच्या प्रचाराला!लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. तीन टप्प्यांचं मतदान पार पडलं आहे. सोमवारी चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वीच नाशिकच्या राजकारणात मोठं ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अजित पवार गटातील नेते थेट शरद पवार गटाच्या प्रचारात पोहोचले आहेत.

विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवळ हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरेंच्या प्रचारात सहभागी झाल्याचं दिसून आलं. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत

राजकीय संघर्षात भाऊ-बहीण एकमेकांविरोधात उभे ठाकले असताना नरहरी झिरवळ हे थेट अजित पवारांच्या उमेदवारांऐवजी शरद पवारांच्या उमेदवारासाठी प्रचार सभेत पोहोचले. नरहरी झिरवळ हे सध्या दिंडोरीचे विद्यमान आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत.

राष्ट्रवादीत फुट पडली तेव्हा झिरवळ यांनी अजित दादांना साथ दिली होती .मात्र, आता ते शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरेंच्या प्रचारात सहभागी झाल्याने त्यांची नेमकी भूमिका काय आणि ते कुणाच्या बाजूने आहेत, याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.

झिरवळ शरद पवारांच्या तंबूत दिसून आल्याने नाशिकच्या राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळात देखील याची एकच चर्चा रंगली आहे.त्यांचे सभेतील फोटो देखील व्हायरल झाले आहेत. त्यामुळे नरहरी झिरवळ हे महाविकास आघाडीमध्ये गेले असल्याचं देखील म्हटलं जातंय. दिंडोरीमध्ये भारती पवार आणि मविआचे भास्कर भगरे यांचा प्रचार जोरात सुरू आहे. अशात नरहरी झिरवळ यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यांच्या भूमिकेबाबत आता वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

Post a Comment

0 Comments