दुर्दैवी घटना! उजनीच्या पात्रात बोट उलटून सहा जण बुडाले, फौजदार पोहून पाण्याबाहेर आला

करमाळा |

उजनी धरणात कुगाव (ता. करमाळा) ते कळाशी (ता. इंदापूर) या दरम्यान बोट उलटून झालेल्या अपघातात झरे (ता. करमाळा) येथील पती-पत्नी व त्यांची दोन लहान मुले तसेच कुगाव (ता. करमाळा) येथील दोघे, असे सहाजण बुडाले आहेत. या दुर्घटनेत एकजण कळाशीकडे पोहत आल्याने बचावला असून इतरांचा शोध सुरू आहे.

मंगळवारी (ता. २१) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भीमा नदीच्या पात्रात करमाळा तालुक्यातील कुगाव येथून ही बोट इंदापूर तालुक्यातील कळाशी या गावाकडे येत होती. त्यात कुगाव व झरे (ता. करमाळा) येथील सात प्रवासी होते. यावेळी जोरदार वादळ सुटल्याने ती बोट उलटली. कुगाव ते काळाशी दरम्यान दररोज या बोटीने प्रवासी वाहतूक केली जाते. दिवसातून साधारणतः ही बोट १० ते १५ फेऱ्या मारते. मात्र, मंगळवारी सायंकाळी बोट बुडून मोठी दुर्घटना घडली. धरणात बुडाल्यांमध्ये एक महिला, तीन पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. या बोटीतील एकजण पोहून कडेला आला.

पोलिस उपनिरीक्षक राहुल डोंगरे असे यातून वाचलेल्या तरुणाचे नाव आहे. बोट उलटल्यानंतर त्यांनी धाडसाने पोहत पोहत कळाशीकडे काठ गाठला व आपला जीव वाचवला. ही सर्व घटना पाहून ते अतिशय घाबरलेल्या अवस्थेत होते. राहुल डोंगरे यांना प्राथमिक उपचारासाठी इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. डोंगरे यांनी धाडसाने पाण्याबाहेर पोहत येऊन ही घटना कळाशी ग्रामस्थांना सांगितली. त्यानंतर तत्काळ ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र पाण्यात काहीही दिसून आले नाही. हे प्रवासी पाण्यात बुडाले असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, बचाव कार्य वेगाने सुरू आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत बेपत्ता झालेल्यांपैकी कोणीही सापडले नव्हते. या घटनेची माहिती समजताच कुगाव व परिसरातील ग्रामस्थ, तरुणांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

Post a Comment

0 Comments