बीड |
लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पुढील काही तासांत सुरू होत असून प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मात्र, मराठा समाजाची तोफ म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, त्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे.
यापूर्वी जरांगे यांनी पत्रकार परिषदेतून गंभीर आरोप केले होते. मला सलाईनमधून विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता, माझ्या कुटुंबावरती हल्ला करण्याचा डाव रचला जातोय. सरकारला माझी निष्ठा विकत घेता येत नाही, म्हणून असा डाव चाललाय, अशी मला खबर मिळाल्याचे जरांगे यांनी म्हटलंय. जरांगे यांनी जालन्यातून संवाद साधताना हा गंभीर आरोप केला आहे. यावेळी, त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. तर, बीडमधील जातीय राजकारणावरही परखडपणे भाष्य केलं.
भावनिक करुन मला मागे सरकवण्याचा काम होत आहे. माझ्या बलिदानाने गृहमंत्र्यांचे समाधान होत असेल तर मी बलिदान द्यायला आणि जेलमध्ये जायला देखील तयार आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जरागेंनी हल्लाबोल केला. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात मराठ्यांची निवडणुकीमध्ये भीती आहे, ती नसती तर बारामती वरुन अंतरवालीमध्ये हेलिकॉप्टर आलं नसतं, असे म्हणत मनोज जरांगे यांनी जय पवार यांच्या भेटीवर भाष्य केलं. कारण,बारामतीमधील निवडणुकांपूर्वीच जय पवार यांनी अंतरवालीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटो व व्हिडिओही सर्वत्र व्हायरल झाले होते
0 Comments