महाराष्ट्र काँग्रेस सुप्रिया सुळेंकडे सोपवण्याचा पवारांचा प्लॅन?? नव्या दाव्याने खळबळ


 येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असं भाकीत करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय बॉम्ब टाकला. पवारांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का? अशा चर्चाना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. यानंतर सध्या काँग्रेसमधून शिंदे गटात गेलेल्या संजय निरूपम  यांनी ट्विट करत मोठा खुलासा केला आहे. शरद पवार अनेक दिवसांपासून आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विचार करत आहेत. आपल्या मुलीकडे महाराष्ट्रात काँग्रेसचे नेतृत्व सोपवण्याची विनंती केली होती, ती काँग्रेसने फेटाळून लावली होती अशी माहिती त्यांनी दिली.


याबाबत संजय निरुपम यांनी ट्विट करत म्हंटल, आदरणीय शरद पवारजी अनेक दिवसांपासून आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विचार करत आहेत. काँग्रेसनेही त्यांना अनेकदा हा प्रस्ताव दिला होता. परंतु त्यांच्या मुलीमुळे पेच निर्माण झाला होता. शरद पवारांनी आपल्या मुलीकडे महाराष्ट्रात काँग्रेसचे नेतृत्व सोपवण्याची विनंती केली होती, ती काँग्रेसने फेटाळून लावली. आता त्यांचा पक्ष फुटला आहे. शरद पवारांच्या या ताज्या विधानाचा अर्थ असा आहे की, बारामती त्यांच्या हातातून निसटून जाऊ शकते, कदाचित त्यांना तशी भीती वाटते. जरी समजा, तस काही झालं नाही तरी काँग्रेसमध्ये विलीन होण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही कारण त्यांच्या मुलीकडे असलेले राजकीय कौशल्य बुडत्या पक्षाला वाचवण्यासाठी अपुरे आहे पण जे विलीनीकरण होणार आहे ते पुन्हा दोन तोट्यातील कंपन्यांचे विलीनीकरण होईल त्यामुळे त्याचा परिणाम शून्यच राहील अशी टीका संजय निरुपम यांनी केली होती.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना शरद पवारांनी म्हंटल होते कि, 2024 च्या निवडणुकीनंतर देशातील अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील किंवा काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस मध्ये विलीन होऊ शकतो का? असा उलट सवाल केला असता काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या, आम्ही गांधी, नेहरू विचारसरणीचे आहोत. परंतु त्यावर आत्ताच काही बोलणं योग्य नाही . सहकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही, याबाबतचा कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल असं म्हणत शरद पवारांनी चर्चाना उधाण आणलं आहे. महत्वाचे म्हणजे काही महिन्यापूर्वीच शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार असल्याच्या बातम्या प्रसारीत झाल्या होत्या, मात्र त्यावेळी त्यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या होत्या.

Post a Comment

0 Comments