काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटलांवर गुन्हा दाखल; चोर समजून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू..!



काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या अकलूज येथील बंगल्यात चोरी करण्याच्या हेतूने शिरल्याच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यात तरुणाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह इतर संशयिताचा शोध घेत आहेत. या मारहाणीत अभिजीत उत्तम केंगार (वय २१, रा. वाघोली, ता. माळशिरस) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी अकलूजचे पोलिस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी स्वतः फिर्याद दिली आहे.

अकलूज येथे धवलसिंह मोहिते-पाटील यांचा प्रतापगड नावाचा बंगला आहे. त्या बंगल्यात अभिजित केंगार हा १८ जानेवारीच्या मध्यरात्री उशिरा शिरला होता. केंगार हा चोरी करण्याच्या उद्देशानेच बंगल्यात शिरला आहे, या संशयातून त्याला काठ्यांनी, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. त्या मारहाणीत तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. पोलिसांनी त्याला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले, त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली हेाती. पण तपासात मारहाणीत मृत्यू झाल्याचे समजताच धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, गिरझणीचे माजी सरपंच सतीश संभाजी पालकर, माजी ग्रामपंचायत सदस्य मयूर नवनाथ माने, हिरा रामचंद्र खंडागळे (रा. अकलूज) आणि इतर अनोळखी चौघांच्या विरोधात गुन्हा (कलम ३०४,३२४, ३४) दाखल करण्यात आला आहे. पालकर आणि माने यांना अटक करण्यात आली आहे. अकलूजच्या उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे-पाटील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments