पत्रकारास धक्काबुक्की करणे भोवले; पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखलबार्शी -

जबाबदारी पार न पाडण्याबाबत वार्तांकन केल्याचा राग मनात धरून पत्रकारास धमकी देऊन धक्काबुक्की करत वार्तांकनास अडथळा निर्माण केलेप्रकरणी एकावर पत्रकार संरक्षण कायदयांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. किरण माने, प्रोजेक्ट मॅनेजर, स्वयम शिक्षण प्रयोग रा. धाराशिव असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उमेद अभियान अंतर्गत काम करणाऱ्या महिलांचे मानधन न मिळाल्याबाबत हिंदवी समाचार चे संपादक धीरज शेळके यांनी बातमी प्रसारित केली होती. त्यानंतर बार्शी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी याबाबत लवकरच तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतर बराच काळ काहीही कारवाई न झाल्यामुळे पत्रकार धीरज शेळके यांनी स्वयम शिक्षण प्रयोग प्रोजेक्ट मॅनेजर किरण माने यांना त्याबाबत प्रतिक्रिया मागितली असता, वार्तांकन केल्याचा राग मनात धरून किरण माने यांनी संपादक पत्रकार धीरज शेळके यांना धक्काबुक्की करत धमकावले. तसेच वार्तांकन चालू असताना वार्तांकनासाठी वापरण्यात येत असलेला मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी सदर प्रोजेक्ट मॅनेजर किरण माने याचे विरोधात भादवि कलम 323, 504, 506 तसेच महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायदा कलम 3 व 4 अन्वये बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी करीत आहेत.

2017 साली अस्तित्वात आलेल्या पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत दाखल झालेला सोलापूर जिल्ह्यातील हा पहिलाच गुन्हा आहे.

Post a Comment

0 Comments