माळशिरस |
घरासमोर ट्यूशन घेणाऱ्या शिक्षकांबरोबर प्रेम जुळले, लग्न करण्याचे दोघांनीही आणाभाका घेतल्या. दरम्यान तरुणीचे दुसरीकडे लग्न जुळल्याने प्रियकरास समजले.
निराश झालेल्या शिक्षकाने तिला तू लग्न करून सुखी रहा, असे सांगितले. दरम्यान तिने आपण पळून जाऊन लग्न करू, अशी थाप मारून निर्जनस्थळी प्रियकराला बोलावले. त्यानंतर रात्रीच्या अंधारात पाच जणांच्या मदतीने तिने प्रियकरावर चाकू, तलवार आणि दगडाने हल्ला केला. जखमी अवस्थेत घाबरलेल्या प्रियकराने कॅनालमध्ये उडी टाकून आपला जीव वाचवला. ही सिनेस्टाईल घटना नातेपुते (माळशिरस) येथील फडतरी रोडलगतच्या कॅनालजवळ घडली. दिनेश चंद्रकांत फडतरे (वय- ३०, मोरोची, माळशिरस, सध्या रा. नातेपुते) असे गंभीर जखमी झालेल्या खाजगी शिक्षकाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी नातेपुते येथील रुग्णालयात दाखल केले.
त्याने दिलेल्या फिर्यादीवरून त्याची प्रेयसी अंकिता अंकुश कचरे (वय-२०), ओम कचरे (पांढरेमळा, नातेपुते), अनिल अंकुश शिंदे (माण, सातारा) छोटू (पूर्ण नाव नाही) आणि एक अनोळखी इसम अशा पाच जणांविरुध्द नातेपुते पोलिसांनी खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र अधिनियमन्वये गुन्हा दाखल केला. त्यापैकी अंकिता कचरे आणि अनिल शिंदे या दोघांना अटक करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
0 Comments