राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण


मुंबई |

राज्यातील दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासंदर्भात कोर्टाने दिलेली मुदत संपल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आधी मुंबई, रायगड, नाशिक आणि त्यानंतर काल पुण्यात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले होते. मनसे कार्यकर्त्यांनी काही दुकानांच्या पाट्यांची तोडफोड केली. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही भेट पार पडली. यावेळी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे देखील उपस्थित होते. यापू्रवी टोल आंदोलनालवुन राज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. राज्यातील टोल नाके आणि दुकानांवरील मराठी पाट्यांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी ही भेट घेतली असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना दिलेली मुदत संपल्यानंतर काही जण मुजोरी करत आहेत. अद्यापही काही दुकानांवर इंग्रजी पाट्यांऐवजी मराठी पाट्या लावण्यास उशीर होत आहे. यामुळे मनसेने आक्रमक होत इंग्रजी तसंच हिंदीत असलेल्या पाट्यांची काही ठिकाणी तोडफोड केली तर काहींना काळं फासलं. पुण्यात तर मनसैनिकांकडून पाट्यांची तोडफोड सुरु झाल्याने पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटपट देखील झाली. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन टोल आणि मराठी पाट्यांवर चर्चा पार पडल्याचं सांगितलं जात आहे.

Post a Comment

0 Comments