पुणे : इंटरनेट पुरवठादार व्यावसायिकाकडे दरमहा दहा हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेने अटक केली. शिवाजीनगर भागातील दीपबंगला चौकात ही कारवाई करण्यात आली. निखिल शिवा कांबळे (वय १९). अतुल अनिल धोत्रे (वय २१), तेजस शिवाजी विटकर (वय २१, तिघे रा. वडारवाडी, शिवाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्यंची नावे आहेत. याबाबत एका इंटरनेट पुरवठादार व्यावसायिकाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार व्यावसायिकाच्या कामगारांकडून पांडवनगर भागात इंटरनेट केबल टाकण्याचे काम करण्यात येत होते. आरोपी कांबळे, धोत्रे, विटकर यांनी कामगारांना धमकावले. या भागात काम करायचे नाही, असे सांगितले. त्यानंतर व्यावसायिक तेथे आला. व्यावसायिकाने आरोपींची भेट घेतली.
या भागात आमच्या परवानगीशिवाय कोणी काम करत नाही. या भागात काम करायचे असेल तर दरमहा दहा हजार रुपये खंडणी द्यावी लागेल, असे आरोपींनी त्यांना सांगितले. त्यानंतर दहा हजार रुपये घेऊन दीपबंगला चौकात बोलावले. व्यावसायिकाने तक्रार दिल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने सापळा लावून तिघांना पकडले. पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव, विजय गुरव, प्रदीप शितोळे, सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, संग्राम शिनगारे, शंकर संपते आदींनी ही कारवाई केली.
0 Comments