पालकमंत्री पद देणे ही मोठ्या कामासाठी केलेली छोटी तडजोड - चंद्रकांत पाटील


सोलापूर |

पुण्याचे पालकमंत्री पद चंद्रकांत पाटील  यांच्याकडून अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू होत्या. पुण्याचे पालकमंत्री  पद गेल्यानंतर भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. पालकमंत्री पद देणे ही मोठ्या कामासाठी केलेली छोटी तडजोड असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे आता कोणत्या मोठ्या कामासाठी ही तडजोड करण्यात आली, याची चर्चा सुरू झाली आहे. 

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादीचा एक गटही सरकारमध्ये सहभागी झाला. त्यानंतर अजित पवार यांना पालकमंत्री म्हणून पुणे जिल्ह्याची जबाबदारी देणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे चंद्रकांत पाटील यांच्याकडून ही जबाबदारी अजित पवार यांच्याकडे देण्यात आली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचे पंख छाटण्यात येत आहे का, अशी चर्चा सुरू झाली होती. तर, अजित पवार यांना पुण्याची जबाबदारी दिल्याने पुण्यातील भाजपच्या अडचणी वाढून राष्ट्रवादीला मोकळं रान मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. 

या पालकमंत्री पदावर अखेर आज चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदाच  भाष्य केले. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत चंद्रकांत पाटील बोलत होते. त्यांनी म्हटले की, माझ्याकडून पुण्याचे पालकमंत्रीपद गेल्याने अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत. कोणीही नाराज व्हायचे कारण नाही, असेही त्यांनी म्हटले. पालकमंत्री पद देणे, ही एका कामासाठी केलेली छोटीशी तडजोड आहे, असे पाटील यांनी म्हटले.

Post a Comment

0 Comments