कोल्हापूर |
लोकशाही न्यूज चॅनल चे संपादक कमलेश सुतार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचा आज कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. दरम्यान रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांचा खुन,पाचो-याच्या आमदारांकडून पत्रकारांवरील खुनी हल्ला तसेच पत्रकारांची होत असलेली मुस्कटदाबी,जेष्ठ पत्रकार सन्मान योजनेचा गलथान कारभार पाहता,पत्रकारांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी आणि पत्रकारांच्या हक्कासाठी लवकरच लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळावर एकदिवसाचे लक्षवेधी आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा हिडीस व विकृतीचे खळबळजनक वृत्त दाखविल्यानंतर लोकशाही न्यूज चॅनलचे संपादक कमलेश सुतार यांच्यावर आज मुंबई पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.याचे तीव्र पडसाद आज प्रसारमाध्यमांतून उमटले.कोल्हापूर प्रेस क्लब कार्यालयात झालेल्या निषेध सभेत लोकशाही न्यूज चॅनलने किरीट सोमय्या सारख्या लोकप्रतिनिधीचे वास्तव समोर आणण्याचे धाडस दाखवले,त्याचे कौतुक करुन,संपादक कमलेश सुतार यांच्यावर दाखल केलेला गुन्हा त्वरीत मागे घेण्याची मागणी केली.तसेच याप्रकरणात व्यभीचाराचे समर्थन करण्याऐवजी शासनाने किरीट सोमय्या यांचीच सखोल चौकशी करुन, सत्य जनते समोर आणावे,कमलेश सुतार यांना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणीही करण्यात आली.याबाबत राज्यपाल मुख्यमंत्री,गृहमंत्री, विरोधीपक्षनेते यांनाही ईमेलद्वारे निवेदन देण्यात येणार आहे.
तसेच येत्या १० सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याने,त्यावेळी काळ्या फिती लावून वार्तांकन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुखदेव गिरी यांच्यासह पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन उपस्थित होते.
0 Comments