सुर्डीच्या दिव्यरत्न गणेश मंडळाने केला गुणवंतांचा गौरव


वैराग |

गणेशोत्सवात होणारा वायफळ खर्च टाळून सुर्डी (पिंपळ गल्ली) ता.बार्शी येथील दिव्यरत्न प्रतिष्ठान गणेश तरुण मंडळ यांच्या वतीने गुणवंतांचा गौरव सोहळा आयोजित केला होता. गावातील गुणवंत विद्यार्थ्यांसह शिक्षक, शासकीय कर्मचारी, माजी सैनिक, प्रगतीशील शेतकरी, ग्रामपंचायत तसेच आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांनी गावासाठी दिलेल्या योगदानाबद्दल दिव्यरत्न प्रतिष्ठान तर्फे सर्वांचा अंजीरचे झाड व गुलाब पुष्प देवून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी श्री. वाय.वाय.काझी (वनपरिमंडळ अधिकारी, महाराष्ट्र शासन) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमात एमपीएससी मधुन मंत्रालय क्लार्कपदी निवड झालेल्या दिपाली प्रकाश शेळके व ज्योती गेनदेव कोंढारे यांचा काझी साहेब यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. दिलीपराव सोपल विद्यालयाचे शिक्षक सुधीर गायकवाड यांनी यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

दिव्यरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव डोईफोडे यांच्या संकल्पनेतून सर्व सत्कारमुर्तींना अंजीर या फळ झाडाचे रोप देत सन्मानित करण्यात आले. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती' या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या वचनाप्रमाणे वृक्षारोपण चळवळीला हातभार लावून मंडळाने सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. मंडळाने तब्बल दोनशे अंजीर रोपट्याचे यावेळी वाटप केले. प्रत्येकाने ही रोपे जोपासण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले.

या गौरव सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी दिव्यरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव डोईफोडे, उपाध्यक्ष संतोष पवार, खजिनदार हनुमंत डोईफोडे, सचिव जुनेद शेख, सह सचिव लक्ष्मण शिंदे, कार्याध्यक्ष अभिषेक शिंदे, सदस्य  प्रशांत शेळके, सुमित दगडे, बालाजी पवार, रामेश्वर शिंदे, आकाश धस, मदन डोईफोडे, तिरूपती डोईफोडे, ओंकार शिंदे, आप्पा शेळके, गोपाळ डोईफोडे, मयुरेश डोईफोडे, समर्थ शिंदे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महावीर शेळके व निलेश डोईफोडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments