बार्शी :
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तेरावा दिवस आहे. दरम्यान आजपासून जरांगे यांनी उपचार आणि पाणी घेण्यास नकार दिला असून, आमरण उपोषण सुरु केले आहे. तसेच, सरकार वेळोवेळी वेळ मागून घेत आहे. त्यामुळे महिना नाही आणखी दोन महिन्या घ्या, पण आरक्षण द्या असे जरांगे म्हणाले आहेत. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्यावरुन आता मनोज जरांगे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
काय म्हणाले जरांगे?
मनोज जरांगे म्हणाले की, "आता पुढील दिशा म्हणजेच आमरण उपोषण सुरु केले आहे. सरकारला कालपर्यंत दिलेला वेळ आता संपला आहे. याचा अर्थ असा नाही की, सरकारने प्रयत्न केले नाही. त्यांनी प्रयत्न केले, पण त्यांनी काढलेल्या जीआरमध्ये चुका झाल्या. त्यामुळे यात मुख्यंमत्री एकनाथ शिंदे नक्कीच बदल करतील. मात्र, त्यांना मी शब्द दिला होता की, चार दिवस पाणी आणि उपचार घेईन. मी माझ्या शब्दावर पक्का असून, आता चार दिवस झाले आहेत. त्यामुळे आजपासून पाणी आणि उपचार घेण्याचं बंद केले आहे.
सरकार एक महिन्याचा वेळ मागत आहे, त्यामुळे वेळ देण्यासाठी आमची काहीही हरकत नाही. आमचं उपोषण सुरुच आहे. तुम्ही एक महिन्याने निर्णय घेऊन या किंवा दोन महिन्यांनी घेऊन या आमची हरकत नाही. पण आरक्षणाचा निर्णय घेऊन या, तोपर्यंत आमचे उपोषण सुरुच राहणार आहे. तसेच पुढील दिशा कशी असणार आहे याबाबत आम्ही आमच्या काही लोकांची आज बैठक घेत आहोत असल्याचे जरांगे म्हणाले.
0 Comments