माजी सरपंच, डॉक्टरसह सहा जणांना शिक्षा ; माढा सत्र न्यायालयाचा निर्णयमाढा |

२०११ साली मोडनिंब येथे झालेल्या मारहाणीतील माजी सरपंच कुरण गिड्डे यांचेसह सहा आरोपीपैकी ३ जणाना साडेचार वर्ष तर इतर दोन जणांना १ वर्षे ३ महिने आणि त्यातील एकाच्या वयाचा विचार करता फक्त दंडाची शिक्षेचा निकाल माढ्याचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिला. शिक्षा सुनावले गेलेल्या आरोपीमध्ये राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठीत असल्या कारणाने या निकालाने मोडनिंबसह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबतची अधिक माहिती अशी की, माढा तालुक्यातील मोडनिंब येथे दि. २५ मार्च २०११ रोजी सायंकाळी ५ वाजता ज्ञानेश्वर उर्फ माऊली बबन पौळ यास माजी सरपंच कुरण गिड्डे व इतर यांनी अमानुष मारहाण केली होती. त्याचा जाब विचारण्यास फिर्यादी सत्यनारायण उर्फ जयसिंग विष्णु गिड्डे व त्याचा भाऊ संग्राम हे गेले असता त्यांना ही अमानुष मारहाण केली होती. त्यावर तिन्ही जखमींनी सोलापूर येथे सिव्हील हॉस्पिटलला उपचार घेतले. फिर्यादी सत्यनारायण उर्फ जयसिंग विष्णू गिड्डे यांनी फिर्याद दिली होती. 

तपास पोलीस निरीक्षक सचिन सस्ते टेंभूर्णी पोलीस स्टेशन यांनी करून आरोपी कुरण दत्तात्रय गिड्डे, डॉ. सागर महादेव गिड्डे, डॉ. योगेश मालोजी गिड्डे मालोजी तुकाराम गिड्डे प्रशांत शंकर जाधव अमृत दत्तात्रय गिड्डे यांचे विरुध्द माढा कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. माढा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जी. व्ही. गांधे यानी आरोपींना दोषी धरून कुरण दत्तात्रय गिड्डे, प्रशांत शंकर जाधव, अमृत दत्तात्रय गिड्डे यांना ४ वर्ष ६ महिने व प्रत्येकी २५००/- रुपये दंड व जखमींना प्रत्येकी ४०००/- रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. तर उर्वरीत आरोपी डॉ. सागर महादेव गिड्डे, डॉ. योगेश मालोजी गिड्डे यांना १ वर्ष ३ महिने व एकूण २५००/- प्रत्येकी दंड तर आरोपी मालोजी तुकाराम गिड्डे यांना वयाचा विचार करून कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व ४०००/- दंड अशी वेगवेगळ्या कलमांतर्गत शिक्षा दिली. यात सरकार पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. या केस कामी मुळ फिर्यादी तर्फे अॅड. एन. के. तांबिले, अॅड. शुभम बळे, सरकारी वकील सचिन भादुले, वैशाली बनसोडे, नामदेव कांबळे वकील यांनी काम पाहिले तर आरोपी तर्फे अॅड. बी. बी. जाधव यांनी काम पाहिले.,

Post a Comment

0 Comments