राष्ट्रवादीवर संकटांचा डोंगर, राहुल गांधी स्वत:हून शरद पवार यांच्या भेटीला



राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली. या बैठकीत 8 ठराव मंजूर करण्यात आले आहेत. यामधील सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे सर्व नेत्यांनी शरद पवार हेच आमचे प्रमुख नेते, असा ठराव बैठकीत घेण्यात आला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना या बैठकीत निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे या सगळ्या घडामोडींनंतर शरद पवार यांच्या दिल्लीतील ‘6 जनपथ’ निवासस्थानी महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज शरद पवार यांच्या दिल्लीतील ‘6 जनपथ’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. त्यांच्यासोबत पक्षाते 40 आमदार असल्याचा दावा केला जातोय. अजित पवार यांच्या या निर्णयाविरोधात शरद पवार आक्रमक झाले आहेत. त्यांनी दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावलेली. ही बैठक संपल्यानंतर राहुल गांधी शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाली. शरद पवार यांच्या पक्षावर कोसळलेल्या या संकट काळात काँग्रेस सोबत आहे, अशी राहुल गांधी यांची भूमिका आहे. राहुल गांधी यांनी अजित पवार यांच्या शपथविधीच्या दिवशी देखील शरद पवार यांना फोन केला होता. त्यानंतर त्यांनी आज शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली आहे.

Post a Comment

0 Comments