बार्शी - निसर्गामध्ये होणारे बदल, पावसाचा अवेळीपणा, अपुरा पाऊस, बियाणे, खते, औषधाचे वाढते दर यामुळे शेतकरी अगोदरच अडचणीमध्ये सापडलेला आहे. बळीराजाला संकटातून बाहेर काढण्यासाठी, शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या हेतूने, मोदी सरकारने प्रधानमंत्री खरीप हंगाम पिकाविमा 2023 या योजनेसाठी नाममात्र 1 रुपया नोंदणी फी आकारणी केली आहे. जास्तीतजास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा, यासाठी पीकविमा नोंदणी आवश्यक आहे. डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने, शासनाच्या योजना शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोचवून, शेतकऱ्यांसाठी मोफत पीकविमा नोंदणी शिबिराचा उपक्रम स्तुत्य असून, बार्शी तालुक्यातील आगळगाव येथे घेण्यात येत असलेला हा उपक्रम महाराष्ट्र राज्यातील पहिलाच उपक्रम असल्याचे प्रतिपादन यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात आगळगावचे ग्रामदैवत श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री भगवंत यांचे पूजन करून तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांनी कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये म्हटले कि, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना राज्यभर कार्यरत असून, चांदा ते बांदा पर्यंत साडेपाच हजार डिजिटल चॅनल या संघटनेमध्ये समाविष्ट झालेले आहेत. बार्शीमध्ये उदयास आलेली राज्यातील पाहिली डिजिटल मिडिया संघटना आगामी काळामध्ये रोल मॉडेल म्हणून देशामध्ये दिशादर्शक ठरेल. संघटनेच्या माध्यमातून फक्त पत्रकारिता न करता, सामाजिक भावनेतून राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 10 व्यक्तींचा सन्मान, मुंबई येथील सह्याद्री अतिथीग्रह येथे तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे व अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला होता. आजच्या आगळगाव येथील उपक्रमानिमित्त तीच परंपरा चालू ठेवली असून, सामाजिक बांधिलकी म्हणून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून, बार्शी तालुका कार्यकारिणी ने राबविलेल्या या उपक्रमाचे अनुकरण करून राज्यामध्ये विविध तालुक्यांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली असल्याचेही यावेळी त्यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रधानमंत्री खरीप पिक विमा नोंदणी शिबिरामधील शेतकऱ्यांची मोफत नोंदणी करून त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पीकविमा नोंदणी पावती देण्यात आली. या शिबिरासाठी आगळगाव परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, जेष्ठ संपादक, माध्यम तज्ञ राजा माने हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले, आगळगावच्या सरपंच पुतळा गरड, उपसरपंच वैभव उकिरडे, तलाठी ताले भाऊसाहेब, शरद उकिरडे, बबनराव गायकवाड, संघटनेचे राज्य संघटक मुरलीधर चव्हाण, राज्य कोषाध्यक्ष अमित इंगोले, राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष सूर्यवंशी, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विजय कोरे, जिल्हा सचिव विनोद ननवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धिरज शेळके यांनी केले तर उपस्थितांचे आभार विक्रांत पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे बार्शी तालुका कार्यकारिणी अध्यक्ष दिनेश मेटकरी, उपाध्यक्ष अमीन गोरे, सचिव धिरज शेळके, खजिनदार विक्रांत पवार, सदस्य भैरवनाथ चौधरी, विकी गोंदकर, राजेश खराडे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी आगळगाव ग्रामपंचायत, कृषी विभागाचे अधिकारी, कृषी सहाय्यक तसेच आबा फाऊंडेशनचे सदस्य, संघवी अॅग्रो सर्व्हिसेस व मधुबन नर्सरी यांचे विशेष सहकार्य लाभले.
0 Comments