बार्शीत हातचलाखीने वृद्धाची फसवणूक, दोघांवर गुन्हा


बार्शी |

सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करून रस्त्यावर भामटे लोक फिरत आहेत असे सांगून ते गळ्यातील सोन्याची चैन  हिसकावून नेतील अशी भीती घालून  सोन्याची चैन विश्वासाने काढायला लावून हातचलाखी करत एक तोळे सोन्याची चैन पळवून नेऊन एका वृद्धाची फसवणूक केल्याची घटना बार्शी शहरात दुपारच्या सुमारास घडली. याबाबत हनुमंत जनार्दन दळवे (वय ६१ रा. मुळगाव पाथ्रूड ता भूम सध्या अलीपुर रोड माऊली चौक बार्शी) यांनी  फिर्याद दिली आहे. त्यावरून दोन अनोळखी व्यक्तीविरोधात बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी हे सेवानिवृत्त वाहक असून ते दि ६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते घरातून भाजी मार्केटकडे पायी निघाले होते. चालत मोहिते गॅस एजन्सीचे पुढे आले असता एका किराणा दुकानासमोरील बाजूस रोडवर झाडाखाली दोन व्यक्ती थांबले होते.  त्यांनी फिर्यादीस हाक मारून बोलावून घेतले व त्यांना म्हणाले की, आम्ही सरकारी अधिकारी आहोत. रस्त्यावर भामटे लोक फिरत आहेत. तुमच्या गळ्यातील सोने कोणीतरी हिसकावून काढून घेईल. तुमच्या गळ्यातील चैन काढून द्या. मी तुम्हाला पुढी बांधून देतो असे म्हणाले. फिर्यादीने सोन्याची चैन काढून त्यांच्या हातात दिली. त्यानंतर त्यांनी एक कागदी पुडी बांधल्यासारखे करून फिर्यादीस कागदाची पुडी देऊन खिशात ठेवण्यास सांगितले. त्यानंतर ते दोघे जैन मंदिर रोडच्या दिशेने मोटरसायकल वरून निघून गेले. ते निघून गेल्यानंतर फिर्यादीने कागदाची पुडी उघडून पाहिली असता त्या पुडीमध्ये सोन्याची चैन ऐवजी दोन पितळी अंगठ्या दिसल्या. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments