ढाब्यावर दारू पिणे पडले महागात हॉटेल चालकांसह ७ मद्यपींविरुद्ध गुन्हे दाखल ; न्यायालयाने ठोठावला ७८ हजारांचा दंड


सोलापूर |

हॉटेल ढाब्यांवर बसून दारु पिणा-यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र सुरुच असून बुधवारी रात्रीच्या सुमारास सोलापूर शहरातील आकाशवाणी रोड आदर्श नगर व विजापूर रोड, सैफुल येथील ढाब्यांवर धाडी टाकून ढाबा चालकांसह त्या ठिकाणी दारु पितांना आढळून आलेल्या ७ मद्यपी ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक १७ मे बुधवारी राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक विभागाचे निरिक्षक सुनिल कदम  यांच्या पथकाने सोलापूर शहरातील आकाशवाणी रोड आदर्श नगर परिसरातील हॉटेल  तोशित या ढाब्यावर धाड टाकून हॉटेल चालक बाळकृष्ण सुभाष जाधव, वय ३२ वर्षे याच्यासह ३ मद्यपी ग्राहक सुनिल अशोक पल्लाटी, अनिल अशोक पल्लाटी, भैरवनाथ मुरलीधर शिंदे यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून १८० मिली क्षमतेच्या रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या दोन बाटल्या, १८० मिली क्षमतेच्या ईंम्पिरीयल ब्लु व्हिस्कीच्या दोन बाटल्या व प्लास्टिक ग्लास असा सातशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  एका अन्य कारवाईत दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ यांच्या पथकाने  विजापूर रोडवरील सैफुल परिसरातील हॉटेल श्री येथे धाड टाकून हॉटेल चालक परशुराम बंडप्पा घोडके, वय ३४ वर्षे व त्याठिकाणी दारु पित बसलेले ग्राहक  रेवणसिध्द  हणमंत बंदिचोडे , हर्ष रामसरन शर्मा, नामदेव महादेव परीट,काशिनाथ रंगनाथ दुमडे अशा ४ मद्यपींना अटक केली. 
त्यांच्या ताब्यातून ६५० मिली क्षमतेची एक टुबर्ग स्ट्रॉंग बिअरची बाटली, ६५० मिली क्षमतेच्या तीन बडवायझर स्ट्रॉंग बिअरच्या बाटल्या, ३७५ मिली क्षमतेची एक  रॉयल स्टॅग व्हिस्कीची एक बाटली, १८० मिली क्षमतेच्या ओकस्मिथ व्हिस्कीच्या दोन बाटल्या व प्लास्टिक ग्लास असा एक हजार नऊशे पंच्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक केलेल्या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ (अ) (ब) व ८४ नुसार गुन्हा दाखल करुन दोन्ही गुन्हयाचे तपास अधिकारी यांनी १८ मे रोजी एक दिवसात गुन्ह्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले असता न्यायदंडाधिकारी दारुबंदी न्यायालय, सोलापूर श्रीमती नम्रता बिराजदार मॅडम यांनी तात्काळ निकाल देत ढाबाचालकाला प्रत्येकी रू. २५ हजार व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी रू. चार हजार असा एकूण  ७८ हजाराचा   दंड ठोठावला आहे. शासनाच्या वतीने सरकारी वकील संतोष पाटील यांनी मा. न्यायालयात समक्षपणे बाजू मांडली.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त मोहन वर्दे, अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक सुनिल कदम,  सुरज कुसळे, दुय्यम निरिक्षक, उषाकिरण मिसाळ, सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, सहायक दुय्यम निरिक्षक मुकेश चव्हाण, जवान शोएब बेगमपुरे, प्रकाश सावंत, अनिल पांढरे, किरण खंदारे यांच्या पथकाने पार पाडली. कोर्ट ऑर्डर्ली मयुरेश भोसेकर यांनी न्यायालयीन प्रक्रियेत मदत केली.

Post a Comment

0 Comments