शेतीमातीचा खरा वारसदार : अशिष वरघणेलेखन : शंकर अभिमान कसबे

 'जगणं महाग होत आहे' हा आशिष वरघणे या लेखकाचा पहिला वहिला कथासंग्रह.परंतु तो वाचल्यानंतर कुठल्याही अंगान पहिला कथासंग्रह आहे असं वाटत नाही.हा कथासंग्रह वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण वऱ्हाडी बोलतील महत्वपूर्ण ऐवज आहे.खरंतर ग्रामीण जीवन म्हणजे एक तारेवरची कसरतच आहे.ग्रामीण जीवनात एक तर शिक्षणाच्या अभावामुळे अज्ञान आणि त्यातून आर्थिक समस्या.जरी शिक्षण घेतलं तरी बेरोजगारी.या व अशा अनेक समस्यांना रोज सामोरे जाण्याचे अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात.अशाच प्रकारच वास्तव मांडणाऱ्या एकूण नऊ कथा आशिष वरघणे यांनी आपल्या या कथासंग्रहामध्ये  लिहिलेल्या आहेत.प्रत्येक कथा ही काळजाला भिडते.प्रत्येक कथेतील वास्तव हे मनाला छिन्न-विछिन्न करते.आपण पाहतो समाजामध्ये माणसाच्या अज्ञानाचा किती गैरफायदा घेतला जातो,माणसाच्या चांगुलपणाचा,भोळेपणाचा कसा गैरफायदा घेतला जातो.त्यामुळेच सर्वसामान्यांच्या वास्तविक जीवनाला कशाप्रकारे तडे जातात.मग आपोआपच जगणं महाग होत जातं.आशिष वरघणे हा डी.एड झालेला व पुढे एम.ए करत असलेला एक सुशिक्षित बेरोजगार तरुण आहे.त्याच्या घरात त्याच्या कुटुंबात तसेही जास्त शिकलेले कोणी नाही.अशाच परिस्थितीत त्याच्यावरती शेतीमातीशी दोन हात करण्याची वेळ येते.सुशिक्षित असून अशिक्षिताप्रमाणे जगण्याची वेळ येते.त्यावेळेस त्याला त्याच्या आजोबा पंजोबांची आठवण येते.आईवडील,आजीआजोबांनी सांगितलेल्या गोष्टींची,लोककथा,लोकगीतांची आठवण येते.तो म्हणतो मी शाळेत अगदी'ढ'.शाळेत जर एखादी बोधकथा किंवा गोष्ट सांगायला लावली तर मला ती पाठ नसायची.मग मी माझ्या पद्धतीने आपल्या आजूबाजूला जे घडलेलं आहे;त्याचीच गोष्ट तयार करून शाळेत बोधकथा म्हणून सांगायचो.परंतु मला त्या गोष्टीचा'बोध'काही केल्या सांगता येत नसायचा.अशाच प्रकारच्या 'बोधकथा' सांगण्याच्या प्रयत्नातून त्याला पुढे कथा सुचत जाते.आणि एक ग्रामीण भागातला दमदार लेखक'जगणं महाग होत आहे'सारख्या कथासंग्रहातून आपल्यासमोर येतो.खरंतर या संग्रहातील प्रत्येक कथा त्याच्या वैयक्तिक जीवनाशी अथवा त्याच्या परिसराशी,त्याच्या गावाशी अथवा त्याच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनातीशी एकरूप झालेल्या कथा आहेत.या संग्रहातील प्रत्येक कथा ही सर्वसामान्य शेतकऱ्याची कथा आहे.कास्तकाराची कथा आहे.प्रत्येक कथेमधला शेतकरी आपापल्या परीने आपल्या जीवनातील संघर्षाला कशाप्रकारे तोंड देतो आहे आणि वैयक्तिक जीवनातील समस्या कमी आहेत की काय,नैसर्गिक समस्या कमी आहेत म्हणून की काय,समाजातील काही अपप्रवृत्तीचे लोक,काही गुंड प्रवृत्तीचे लोक,वरतुन त्यांचा कसा अमानुषपणे छळ करतात.शेतकऱ्याला कष्टकऱ्याला वेळोवेळी कसं नागावलं जातं.याचं भयावह चित्रण या कथासंग्रहातून आलेलं आहे.

पहिलीच कथा 'बुडती हे जन न देखवे डोळा' मधील 'तुका' कृषी केंद्राचाचा' मालक 'शेतकऱ्यांना बोगस औषधे देतो.या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पोराच्या हुशारीने पांडुरंगकाका तुकाच्या विरोधात कसा मोर्चा उभारतो.कसा यशस्वीपणे तुकाचा खोटारडेपणा,अनैतिक वर्तन जगासमोर आणतो.याचं अप्रतिम शब्दांकन या कथेद्वारे उलगडत जातं.
       दुसरी कथा 'वादळ' या कथेत निसर्ग, त्यासोबतच विजेच्या प्रश्नांनी हैराण झालेले शेतकरी आणि तीच विजेची तार तुटून जनावरांच्या गोठ्यात पडल्यामुळे झालेलं शेतकऱ्याचं भयानक नुकसान;या तिहेरी संकटात अडकलेला शेतकरी कथेमधून आपल्याला पाहायला मिळतो.तात्पुरत्या फायद्यासाठी अज्ञानातून शेतकऱ्यांच्या हातून कधी कधी चुका होतात आणि त्या चुका शेतकऱ्याच्या आयुष्यभराच्या जगण्यावर विद्रुपतेचे कसे वळ उमटवून जातात.याचं वर्णन या कथेतून आलेलं आहे.कर्जामुळे शेतकरी हैराण आहे,घरात उद्या पोरीचं लग्न आहे आणि हातात येणार पीक वादळाने खुडून नेलं आहे अशा प्रकारचा विचित्र दैवाचा खेळ या कथेतून पाहिला मिळतो.

तिसरी कथा 'तोंडचा घास जीव टांगणीला' याकथेत शेतकरी उसनपासन करून,कर्ज काढून,खर्चाची तोंड मिळवणी करून भरघोस पीक शेतात पिकतो परंतु हे पीक शेतातून खळ्यात येण्यासाठी मजुरांची आवश्यकता असते आणि सगळीकडेच कामाची तलाल हल्ल्यानंतर मजूर वर्ग भेटत नाही.तोवर अशाच परिस्थितीत अवकाळी पावसाचा तडाका  पिकावर बसतो आणि शेतकऱ्यांच्या साऱ्या स्वप्नांवर कसा नांगर फिरतो;याच भयावह चित्र या कथेतून आलेलं आहे.
अगोदरच शेतकरी कर्जात डुबलेला आहे.त्यात तो अशिक्षित आहे.अडाणी आहे.वरून त्याला व्यसन जडलेले आहे.त्याची मुलं शिकू पाहत आहेत पण घरात आर्थिक परिस्थितीमुळे,अज्ञानामुळे नोकरी ऐवजी शेतकरी मुलाला शेती करावी लागते.आणि शेती करत असताना व्यसनाच्या आहारी गेलेल्या बापाचा सामनाही करावा लागतो.म्हणून मुलगा शेतीसाठी कर्ज काढतो,मित्रांच्या पुढे हात पसरतो आणि मित्राकडून आणलेले तेच पैसे जेव्हा व्यसनाधीन असणारा शेतकरी बाप मुलाच्या पाश्चात आईकडून हिसकावून नेतो.त्या पैशासाठी आईला मारहाण करतो.तेव्हा 'घात'नावाची कथा अशिषच्या लेखणीतून जन्माला येते.
         
  'भाकर' नावाच्या कथेत सरकारच्या ताब्यात गेलेल्या धरणग्रस्त जमिनीवर शेतकऱ्यांनं कपाशीची लागवड केली आहे.कापूस भरभरून आलेला आहे. पऱ्हाटीचा कापूस वेचायची वेळ, नेमका सरकारचा जे.सी.बी पिकावर कर्दनकाळ म्हणून चालून यावा.शेतकऱ्यांनं स्वतःच्या जीवाला न पाहता सरकारी गोष्टीला विरोध करावा परंतु शेतकऱ्यांना अज्ञानातून सरकारच्या ताब्यात दिलेल्या जमिनी व त्यावर उचललेल्या किरकोळ रकमेमुळे शेतकऱ्याचा नाविलाज व्हावा.ज्या जमीनीत बोरी बाभळी, झाडझुपं वाढायची अशा पड जमीनीला हिरवगार करण्यासाठी आख्ख आयुष्य घालवलं.आणि ज्या आमदाराला निवडून आणण्यासाठी जीवनाचं रानं केलं आज त्याच राजकीय पुढाऱ्यांनं जगणं नकोसं केलं.अशा प्रकारची कथा जी काळजावर अनेक घाव करते.जिथे राजकीय लोक मतदानापुरता शेतकऱ्यांच्या कष्टाचा उपयोग करून घेतात. याचं विचित्र चित्र या 'भाकर' नावाच्या कथेतून आलेलं आहे. 
                                                          'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' या कथेमध्ये व्यसनाधीन शेतकऱ्याचं जगणं मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे.व्यसनाधीन नवऱ्याला सुधारण्यासाठी त्याची पत्नी कोणकोणते उपाय योजिते.नवऱ्याला व्यसनातून बाहेर काढण्याचा कसा प्रयत्न करते.अशा प्रकारचं स्त्रियांचं संसारातील संघर्षमय जीवन या कथेतून रेखाटण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. 
'कथानायक' पहिल्याच मुलाच्या जन्मानंतर स्वतःची नसबंदी करून घेतो‌.छोटं कुटुंब असावं ज्यामुळे आपले जीवन सुखी होईल.अशी स्वप्न रंगवतो.परंतु नसबंदीचे गुपित आपल्या बायकोला कळू देत नाही. आणि दुसऱ्या आपत्त्यासाठी त्याची पत्नी मात्र इकडे देव देवर्शी,देवधर्म या थोतांडाचा आधार घेते.परंतु छोटे कुटुंब सुखी कुटुंब या विचाराने कथेचा नायक आपल्या बायकोपासून नसबंदीचे गुपित लपवून ठेवतो आणि बुवाबाजीचा खोटारडेपणा उघड करण्यासाठी हे गुपित आपल्या बायकोला योग्य वेळी सांगतो.याचं सुंदर वर्णन या रहस्यमय कथेत लेखकांनी केलेलं आहे.

या कथासंग्रहातील 'कोणीच कसं बोलत नाही' ही कथा जीवाला खूप चटका लावून जाते.या कथेमधला विजय नावाचा नायक,शेतीच्या कामासाठी किती उठा ठेवा करतो.किती धडपड करतो आणि धडपड करून शेतामध्ये 'झेंडू' पिकवतो.पण किरकोळ कारणासाठी बाजारात झालेल्या भांडणात त्याचा झेंडू चोरीला जातो.आणि चोर पकडला जाण्याऐवजी पोलीस त्यालाच गुन्हेगार साबित करतात.तेव्हा त्याच्यावर आलेली जीवघेणी वेळ प्रत्येकाला विचार करायला भाग पाडते.अगोदरच कर्जाचा डोंगर त्यात वरतून विचित्र वृत्तीच्या लोकांच्या तावडीत सापडलेला निष्पाप निरागस विजय नावाचा शेतकरी पोलिसाच्या जाळ्यात कसा अडकतो आणि आपलाच माल चोरीला जाऊन देखील पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याला दोन हजाराचा दंड भरावा लागतो.आणि हा सर्व प्रकार पहाणारे शेतकरी मित्र मात्र काहीच बोलत नाहीत. इतकी भयानक सामाजिक विचित्र परिस्थिती या कथेतून आलेली आहे.
  शेवटची कथा 'जगणं महाग होत आहे' अतिशय उत्कृष्ट कथा आहे हिला उत्कृष्ट तरी कसं म्हणावं या कथेमध्ये खूपच ह्रदय द्रावक वेदना मांडलेली आहे. बाप मेलेल्या पोराचं जगणं किती विचित्र आहे.त्याला शिक्षणाची आवड आहे.तो हुशार आहे.पण परिस्थिती वाईट असल्यामुळे ना तो शेत पिकू शकतो न शाळा शिकू शकतो.अशा परिस्थितीत फी भरायला महाग असणारा मुलगा एका दारू धंदा करणाऱ्या माणसाच्या जाळ्यात सापडतो.सफरचंदाच्या पेट्या म्हणून दारूच्या बाटल्यांच्या पेट्या त्याला पोहच करायला लावल्या जातात.किरकोळ पैशाच्या मोबदल्यात तो पेट्या पोहोचवायला जातो आणि पोलिसांच्या तावडीत सापडतो.आणि स्वतःचं आयुष्य बरबाद करून घेतो.ज्यावेळेस तो पोलिसांच्या तावडीत सापडतो त्यावेळेस त्याला कळतं की या सफरचंदाच्या पेट्या नसून दारूच्या पेट्या पोचवायला चाललो होतो आणि आपल्याला खोटं सांगितलं गेलं होतं.त्यावेळेस एक निष्पाप जीव असाहयपणे परिस्थितीच्या कारणाने स्वतः:चं आयुष्य बरबाद करून घेतो.तेव्हा या जगातील अपप्रवृत्तीच्या लोकांची कीव येते.या कथासंग्रहात हलकट राजकीय लोकांचं वर्णन आलेलं आहे.बुवाबाजी करणाऱ्या भोंदू बाबांचे वर्णन आलेलं आहे.शेतकऱ्याला फसवणाऱ्या व्यापाऱ्यांचे वर्णन आलेलं आहे.दारू धंदा करणाऱ्या व्यापाऱ्याचं वर्णन आलेलं आहे.वेगवेगळ्या प्रकारे शेतकरी शेतकऱ्यांचं कुटुंब अनेक ठिकाणी कसं अडचणीत सापडतं याची विचित्र उकल या कथासंग्रहात आलेली आहे.
या कथासंग्रहास आदरणीय डॉ.किशोरजी सानप यांची प्रस्तावना लाभली असून या पुस्तकाची पाठराखण आदरणीय राजनजी गवस सर यांनी केलेली आहे.तसेच लेखकाचं हे पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेतून प्रकाशित झालेलं आहे. खरंच लेखकाची लेखन शैली,त्याचा त्याच्या बोलीभाषेवरील पगडा आणि मुक्तपणे व्यक्त होत जाणं.वाचकाच्या काळजाला साद घालणार आहे. आशिष वरघणे यांच्या कथा महाराष्ट्रातील वाचकांच्या मनावर अधिराज्य नक्कीच गाजवतील हे नक्की

कथासंग्रह : जगणं महाग होत आहे
लेखक : आशिष आत्माराम वरघणे
प्रकाशक : पायगुण प्रकाशन,अमरावती

स्वागत मुल्य : ७६ ₹

Post a Comment

0 Comments