पुणे |
पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूंकाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सत्तांतरानंतर जनतेतून होणारी ही राज्यातील पहिलीच निवडणूक असलेल्या महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कसब्यातून भाजपाने स्व. मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातून उमेदवार न देता हेमंत रासने यांना मैदानात उतरवले आहे. रासने यांच्या प्रचारासाठी भाजपासहित शिंदे गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सहित इतर घटक पक्ष दिवसरात्र एक करत आहेत.
अशातच कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात कसब्याचे ‘किंगमेकर’ खासदार गिरीश बापट सक्रिय झाले आहेत. प्रकृती बरी नसतानाही गिरीश बापट यांनी प्रचारात उतरण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे. खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत कसब्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा केसरीवाड्यात पार पडला आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच बापट जाहीरपणे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिसले.
कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढाई सुरु असल्याने गिरीश बापट आजारपण बाजुला सारून आपल्या पक्षासाठी प्रचाराच्या मैदानात उतरले. नाकात ऑक्सिजनची नळी आणि बोटाला ऑक्सिमीटर लावून व्हिलचेअरवरुन गिरीश बापट कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उपस्थित होते.
बापट यांचा सर्वसामान्य नागरिकांशी दांडगा जनसंपर्क असून त्यांच्या शब्दाला या मतदारसंघात विशेष महत्व आहे. हेमंत रासने हे गिरीश बापट यांच्याच तालमीत तयार झालेले नेते आहेत. ते बापट यांना आपल्या गुरुस्थानी मानतात त्यामुळे बापट सक्रीय झाल्याचा मोठा फायदा त्यांना होऊ शकतो. हे सर्व ओळखून आता विरोधक बापट आजारी असताना त्यांना प्रचारासाठी का उतरवले असा मुद्दा उपस्थित करू लागले आहेत.भाजप त्यांच्या जीवाशी खेळ खेळत आहे असा देखील आरोप होत आहे.
मात्र विरोधक बापट यांच्या तब्येतीच्या काळजीने नव्हे तर समोर पराभव दिसू लागल्याने अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत असा आरोप भाजपकडून केला जात आहे. खरतर बापट ज्या स्थितीमध्ये आहेत त्यावेळी कोणीही त्यांना प्रचारात या असं सांगणार नाही हा मुद्दा इथे लक्षात घेणे महत्वाचे आहे. पक्षासाठी त्याग, निष्ठा, समर्पण करण्याची शिकवण लहानपणापासून बापट यांना मिळाली असल्याने ते स्वस्थ कसे बसू शकतील ? काल बापट सक्रीय झाल्याचे पाहून एकप्रकारचे भावनिक वातावरण तयार झाले आहे त्यामुळे याचा फायदा भाजप उमेदवाराला मिळू नये म्हणून तर विरोधक अशी टीका करत नाहीत ना ? असा देखील सवाल उपस्थित होत आहे.
0 Comments