पैशाचा पाऊस अन् पहिलाच चेक बाऊन्स असाच हा अर्थसंकल्प - खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर




बार्शी |

दरवर्षी नुसत्या घोषणा करायच्या पण प्रत्यक्षात काय साध्य झाले याचा आढावा घेतला तर हाती काहीच लागत नाही. म्हणजे पैशाचा पाऊस अन् पहिलाच चेक बाऊन्स असाच उल्लेख अर्थसंकल्पाचा करावा लागेल अशी प्रतिक्रिया खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली. मागील दोन अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दिडपट व मागच्या वर्षी दुप्पट करण्याची घोषणा केली, प्रत्यक्षात हे घडण्यासाठी केंद्र सरकारने काय पाऊले उचलली ? असा प्रतिप्रश्न उपस्थित करुन राजेनिंबाळकर यांनी उदाहरणादाखल कांदा व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा अभ्यास करण्याचे अवाहन केले आहे. कांदा पिकाच्या बाबत केंद्र सरकारने घेतलेला निर्णय धोऱण म्हणुन निश्चितच चुकीचा आहे.     

शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध होणार असल्याचे जाहीर केले असले तरी नेमकं कोणत्या बाबीसाठी हा निधी देणार याविषयी कसलीच माहिती दिली गेली नाही. कृषी क्षेत्रासाठी विशेष डिजीटल सेवेचा वापर करण्यासाठी मोठा निधी दिला जाणार असला तरी अजुनही शेतकरी आत्मनिर्भर झालेला नाही, तेव्हा आभासी जगाच्या गप्पा मारणे सरकारने बंद करावे व थेट शेतकऱ्यांना फायदा होईल अशा योजना राबविण्याची गरज असल्याचे मत खासदार राजेनिंबाळकर यानी व्यक्त केले. ग्रामीण भागात अत्यंत महत्वाची ठरलेली मनरेगा योजनेचा उल्लेख देखील अर्थसंकल्पात न करणे ही बाब मजुर व शेतमजुरावर अन्यायकारक ठरली आहे. ग्रामीण भागातील गरीब व मजूर यांच्या रोजगार आणि महागाईची सोडवणुक करण्याच्या बाबत सरकारने दुर्लक्ष केल्याने हा घटक मोठ्या अडचणीत सापडण्याची भिती खासदार राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केली आहे. दरवर्षीप्रमाणे पुन्हा पंतप्रधान आवास योजनेचे गाजर बजेटमध्ये दाखविले आहे, दर अर्थसंकल्पात प्रत्येकाला घर देण्याची घोषणा होते मात्र ठरलेले लक्ष्य देखील गाठु शकत नसल्याचे वास्तव सरकार मान्य करत नाही. गेल्या अर्थसंकल्पात केलेल्या किती घोषणा प्रत्यक्षात राबविला याचा आढावा येणे अपेक्षित असते, 'पुढचे पाठ व मागचे सपाट' अशी स्थिती अर्थसंकल्पाबाबत निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments