सोलापूर |
माझी वसुंधरा अभियान २० अंतर्गत उच्चत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना बक्षिस रकमेचे वितरण व बक्षिस रकमेच्या विनियोगाची कार्यपध्दती शासनाने निश्चित केली आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये मंद्रुप ने राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. सोलापूर जिल्हयात प्रथमच एक कोटी रूपये बक्षीस मिळविणारी मंद्रुप ग्रामपंचायत पहिली ठरली आहे. सिईओ दिलीप स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी या साठी विशेष प्रयत्न केले.
मंद्रुप ग्रामपंचायतीने मोठे प्रयत्न करून विशेष कामगिरी केली आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने शासन निर्णय क्रमांक दिनांक: ०५ डिसेंबर २०२२ नुसार बक्षीसे जाहिर केली आहेत. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित "माझी वसुंधरा अभियान" हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक २ ऑक्टोबर, २०२० राबविण्यास सुरवात झाली. "माझी वसुंधरा अभियान २. ०" हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक १६ एप्रिल, २०२१ ते दिनांक ३१ मार्च, २०२२ या कालावधीत राबविण्यात आले. माझी वसुंधरा अभियान २. ०० मध्ये राज्यातील ४०६ नागरी स्थानिक संस्था व ११, ५६२ ग्राम पंचायती अशा एकूण ११. ९६८ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता. "माझी वसुंधरा अभियान २. ० अंतर्गत निर्गमित करण्यात आलेल्या टूलकिट नुसार डेस्कटॉप असेसमेंट करिता अमृत शहरांसाठी ६००० गुण, नगर परिषद, नगर पंचायत व मागील वर्षात सहभागी झालेल्या ग्राम पंचायतीसाठी ५५०० तर दहा हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्राम पंचायतींच्या गटासाठी ५०५० गुण ठेवण्यात आले होते. फिल्ड असेसमेंटसाठी दहा हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्राम पंचायतींचा गट वगळता इतर गटांसाठी २५०० गुण तर दहा हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्राम पंचायतींच्या गटासाठी २१५० गुण ठेवण्यात आले होते. माझी वसुंधरा अभियान २० मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियान कालावधीत केलेल्या कामाचे डेस्कटॉप मुल्यमापन व फिल्ड मुल्यमापन त्रयस्त यंत्रणांमार्फत करण्यात आले. या दोनही मुल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे माझी वसुंधरा अभियान २. ० मधील विविध ०५ गटातील विजेते तसेच, महसूली विभाग व जिल्हयाच्या एकूण कामगिरी वरून सर्वोत्तम विभागीय आयुक्त, सर्वोत्तम जिल्हाधिकारी व सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची शासनाच्या मान्यतेनंतर निवड करण्यात आली आहे. याबाबतचा निकाल दिनांक ५ जून २०२२ जाहिर करण्यात आला असून, गुणानुक्रमानुसार सर्वोत्तम ठरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकारी तपशील जाहिर केला आहे. या मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये मंद्रुप ग्रामपंचायतीस १ कोटी रूपयाचे बक्षीस जाहिर करणेत आले आहे.
माझी वसुंधरा अंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यांतील मंद्रुप ग्रामपंचायतीस १ कोटी रूपयाचा पुरस्कार शासनाने जाहिर केला आहे. यामुळे माझी वसुंधरा अभियानासाठी झटलेले सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दिलासा देणारी घटना आहे. काम केलेनंतर त्याची योग्य दखल घेणेत आली आहे. सोलापूर जिल्ह्यात माझी वसुंधरा साठी चळवळ उभी केली होती. त्याचे हे यश आहे. या साठी झटलेले सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन अशी प्रतिक्रिया सिईओ दिलीप स्वामी यांनी दिली. ग्रामपंचायतत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी नाशिक येथे उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता असताना नोडल अधिकारी म्हणून माझी वसुंधरा अभियाना साठी काम केले होते. त्यांनी पिंपळगाव बसवंत राज्यात पहिली आणली होती. सिईओ दिलीप स्वामी यांनी यास चळवळीचे रूप दिले व त्यास अनुभवाचे जोरावर उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी जोरदार अंमलबजावणी करून मंद्रुप ग्रामपंचायतीस यश मिळवून दिले आहे. ग्रामसेवक नागेश जोडमोटे व त्यांची सर्व टीम यांचे योगदान महत्वपुर्ण आहे.
0 Comments