"बाळ निवडणुकीतून माघार घे..!" खासदार ओमराजे व जिल्हाधिकारी यांना जीवे मारण्याची धमकी



धाराशिव |

महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यामंधील ग्रामपंचायत निवडणुकांचे मतदान रविवारी पार पडणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. आणि अशातच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे आणि उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले आहे.

तुळजापूर तालुक्यातील मसाला खुर्द गावातील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मसाला खुर्द गावातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवाराच्या घरावर अज्ञाताकडून हे पत्र चिकटवण्यात आले आहे. या पत्राने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करून कारवाई करावी अशी मागणी उमेदवाराने केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी किसान सेलचे प्रदेश सचिव ज्ञानेश्वर साळवे यांच्या मातोश्री कांताबाई साळवे या मसाला खुर्द गावातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवार आहेत. त्यांच्या घरावर अज्ञाताकडून हे धमकीचे पत्र चिटकवण्यात आले आहे. निवडणुकीतून माघार घे, अन्यथा कुटुंबाला कायमचं संपवू, अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर आणि जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांना देखील या पत्रातून धमकी देण्यात आली आहे. या पत्रात खासदार ओमराजे निंबाळकर यांचा ‘बाळ’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

दरम्यान, मसाला खुर्द या गावात सरपंचपदाची निवडणूक ही बिनविरोध झाली आहे. स्थानिक विकास आघाडीच्या उमेदवारांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. सरपंचासोबतच ११ जागे पैकी ७ सदस्यांच्या जागा देखील बिनविरोध झाल्या आहेत. तर चार जागांसाठी येत्या रविवारी मतदान पार पडणार आहे. ४ जागेसाठी २ स्थानिक पॅनलमध्ये लढत होणार आहे.

Post a Comment

0 Comments