सोलापूर | 2 ढाब्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडी ; 9 मद्यपींसह 2 हॉटेल चालकांविरूद्ध गुन्हे दाखलन्यायालयाने ठोठावला 68 हजारांचा दंड


सोलापूर |

 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने रविवारी (ता. 11 डिसेंबर)  रात्रीच्या सुमारास शहरातील अक्कलकोट रोड व बार्शी रोडवरील धाब्यांवर अचानक धाडी टाकून धाबा चालकांसह त्या ठिकाणी दारु पितांना आढळून आलेल्या 9  मद्यपी ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, दिनांक 11 डिसेंबर रविवारी राज्य उत्पादन शुल्क ब विभागाच्या पथकाने सोलापूर-बार्शी रोडवरील भोगाव गावाच्या हद्दीतील होटेल गावरान तडका या ठिकाणी धाड टाकून होटेल मालक बलभीम शिवाजी तांबे, रा. अंबिकानगर, बाळे याच्यासह मद्यपी ग्राहक सोमनाथ बसवराज चौगुले, अनिल तायाप्पा तांबे, नागनाथ रामलिंग कल्याणकर, परमेश्वर चंद्रकांत माने व परमेश्वर हरिश्चंद्र शेळके यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून इंपेरियल ब्ल्यु व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 2 बाटल्या व मॅकडॉवेल नंबर 1 व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 3 बाटल्या, काचेचे ग्लास व 5 प्लास्टीक खुर्च्या असा एकूण दोन हजार तीस रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अक्कलकोट रोड शांती चौक येथील होटेल दीपक या धाब्यावर धाड टाकून त्याठिकाणाहून चंद्रकांत रामण्णा साळुंखे रा. रविवार पेठ या होटेल मालकासह त्या ठिकाणी दारु पित बसलेले 4 मद्यपी ग्राहक नामे संगमेश्वर मलय्या राठीमाणी, प्रकाश गणू चव्हाण, चिदानंद अंजनप्पा बिराजदार व रमेश धनजू चव्हाण यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून इंपेरियल ब्ल्यु व्हिस्कीची 375 मिली क्षमतेची 1 बाटली व 180 मिली क्षमतेची 1 बाटली व काचेचे ग्लास असा एकूण पाचशे चाळीस रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. 

सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 (अ) (ब) व 84 नुसार गुन्हा दाखल करुन गुन्हयाचे तपास अधिकारी यांनी 12 डिसेंबर रोजी एक दिवसात गुन्ह्याचे आरोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले असता श्रीमती नम्रता बिरादार, न्यायदंडाधिकारी दारुबंदी न्यायालय,सोलापूर यांनी तात्काळ निकाल देत दोन्ही ढाबाचालकांना प्रत्येकी रू. 25,000/- व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी रू. दोन हजार असा एकूण 68 हजारांचा दंड ठोठावला आहे. 

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त अनिल चासकर, अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक  आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक सदानंद मस्करे, सुनिल कदम, दुय्यम निरिक्षक अंकुश आवताडे, सुनिल पाटील, उषाकिरण मिसाळ, गणेश उंडे, सहायक दुय्यम निरिक्षक गजानन होळकर, जवान प्रियंका कुटे, अनिल पांढरे, प्रशांत इंगोले, इस्माईल गोडीकट, प्रकाश सावंत व वाहनचालक रशीद शेख व मारुती जडगे  यांच्या  पथकाने पार पाडली.

Post a Comment

0 Comments