'आप' नेत्याची आत्महत्या, पैसे घेऊनही तिकीट न दिल्याने जीव दिल्याचा भाजपचा आरोप


राजौरी गार्डन भागात आम आदमी पक्षाच्या एका नेत्याने आत्महत्या  केली आहे. संदीप भारद्वाज असं या नेत्याचं नाव असून ते 'आप'च्या व्यापार विभागाचा सचिव होते. राहत्या घरात भारद्वाज यांनी गळफास लावून आत्महत्या केली असून विरोधकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारद्वाज यांनी
त्यांच्या राहत्या घरात आत्महत्या केली असून सीआरपीसीच्या कलम 174 अंतर्गत सदर प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. संदीप भारद्वाज यांचा स्वत:चा व्यवसाय होता. भारद्वाज मार्बल्स नावाचं त्यांचं दुकान होतं. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी भारद्वाज यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.

भारद्वाज यांच्या आत्महत्येनंतर भाजपने पुन्हा एकदा आम आदमी पक्षावर टीका करण्यास सुरुवात केली असून भारद्वाज यांना पैसे देऊनही केजरीवाल यांनी तिकीट न दिल्याचा आरोप भाजपच्या आय. टी. सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे. मालवीय यांनी एक ट्विट केलं असून त्यात म्हटले आहे की, भारद्वाज यांनी आगामी दिल्ली महापालिका निवडणुकीच्या तिकीटासाठी तगडी रक्कम दिली होती, मात्र केजरीवाल यांनी तिकीटासाठी त्याहूनही अधिक रक्कम देणाऱ्याला ते तिकीट विकले होते. मालवीय यांनी आरोप केला आहे की, केजरीवाल यांच्या पक्षाने दिल्लीची वाट लावलीच आहे आता कुटुंबेही उद्धवस्त करण्यास सुरुवात केली आहे.

हे आरोप प्रत्यारोप होत असताना दिल्ली पोलिसांनी मात्र
आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप कळालं नसल्याचं म्हटलं आहे. भारद्वाज यांनी आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहिली नव्हती. ते दोन दिवस घराबाहेर पडले नव्हते असं पोलिसांनी म्हटलं आहे. किर्ती नगर पोलिसांनी भारद्वाज यांच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवला असून पुढील तपास सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments